रोहित शर्माने खेळपट्टीबाबत टीकाकारांची बोलती केली बंद

(sports news) इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला. टीम इंडियाने राजकोटमध्ये इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केला. कसोटी इतिहासातील धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०२१ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला होता. विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खेळपट्टीवरुन टीका करणाऱ्यां प्रत्युत्तर देताना म्हणाला की, भारतीय संघ कोणत्याही खेळपट्टीवर सामना जिंकू शकतो.

“आम्ही भविष्यातही निकाल देत राहू”

रोहित म्हणाला, “आम्ही यापूर्वी अशा विकेट्सवर अनेक सामने जिंकले आहेत. वळणावळणाच्या खेळपट्ट्या, जिथे चेंडू वळतो, तीच आमची ताकद राहते. यामुळे आपल्याला संतुलन मिळते. आम्ही अनेक वर्षांपासून निकाल दिले आहेत आणि आम्ही भविष्यातही निकाल देत राहू. परंतु आम्ही काही गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही, जसे की आम्हाला रँक टर्नर पिच हवी आहे की नाही यावर आम्ही चर्चा करत नाही.”

‘दोन दिवसांत आपण काय करू शकतो?’

भारतीय कर्णधार म्हणाला, “आम्ही सामन्याच्या दोन दिवस आधी मैदानावर पोहोचतो आणि तरीही दोन दिवसांत आम्ही काय करू शकतो? क्युरेटर ठरवतात आणि खेळपट्टी तयार करतात. कोणत्याही विकेटवर खेळून सामना जिंकण्याची आमच्यात ताकद आहे. जेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे सामना जिंकला, तेव्हा ती विकेट कशा प्रकारची होती, हे सर्वांनाच माहीत आहे.” (sports news)

राजकोटमध्ये नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करत ४४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी होती. त्यानंतर भारताने ४ बाद ४३० धावा करून दुसरा डाव घोषित केला. एकूण आघाडी ५५६ धावांची झाली. यानंतर ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव १२२ धावांवर आटोपला. मालिकेतील चौथा सामना २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *