इराणच्या हुसेनवर महाराष्ट्र केसरी सिकंदरची बाजी

(sports news) कुंडल (ता. पलूस) येथे रविवारी झालेल्या ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख (कोल्हापूर, गंगावेस तालीम) विरुद्ध हुसेन रमजानी (इराण) यांच्यात झालेल्या लढतीत सिकंदर याने तिसर्‍या मिनिटाला एकचाक डावावर विजय मिळवत उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

सुरुवातीपासूनच सिकंदरने हुसेनवर चपळाईने चढाई केली. सुरुवातीची एक-दोन मिनिटे दोघा मल्लांत जोरदार चढाई झाली. पण, सिकंदरने अत्यंत शिताफीने हुसेनवर चढाई करीत तिसर्‍या मिनिटाला एकचाक डावावर विजय मिळविला.

दुसर्‍या क्रमांकाची कुस्ती माऊली कोकाटे विरुद्ध गौरव मछवाडा यांच्यात झाली. सुमारे 15 मिनिटांच्या झटापटीनंतर ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. माऊलीने गौरववर दुसर्‍या मिनिटाला कब्जा घेत घुटना ठेवला. घुटना काढण्याचा गौरवने प्रयत्न केला, पण परत माऊलीने कब्जा घेतला. 7 व्या मिनिटाला कुस्ती झाल्यासारखी असतानाच कुस्तीशौकिनांनी कुस्ती झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे परत कुस्ती लावण्यात आली. पण, ही कुस्ती बरोबरीत सोडवली.

तिसर्‍या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर विरुद्ध मिर्झा इराण यांच्यात झाली. यामध्ये चौथ्या मिनिटाला मिर्झा इराणने हर्षलवर मात करीत प्रेक्षकांची वाहव्वा मिळवली.

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध प्रकाश बनकर यांच्यातील कुस्ती दीर्घकाळ चालल्यानंतर पंचांनी 6 मिनिटांचा वेळ दिला. कुस्ती निकाली होत नसल्याचे लक्षात येताच पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली. (sports news)

सतपाल आखाड्याचा युधिष्ठिर व नवखा असलेला जयदीप पाटील यांच्यात लढत झाली. यात युधिष्ठिरवर चौथ्या मिनिटाला घुटना डावावर जयदीपने विजय मिळवत प्रेक्षकांची वाहव्वा मिळवली.

मैदानाचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले. मैदानास विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेटी दिल्या. मैदानाचे संयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *