शेवग्याच्या शेंगांपासून बनवा पौष्टिक ‘शेकटवणी’

सध्या ‘मोरिंगा’ [Moringa] नूडल्स, मोरिंगा पराठा अशा पदार्थांबद्दल आपल्याला सतत ऐकायला मिळते. मात्र या ‘मोरिंगा’ म्हणजेच आपल्या लाडक्या शेवग्याच्या शेंगा. आपण अनेकदा या शेंगांचा वापर आमटीमध्ये, रस्सा किंवा सांबार बनवताना करत असतो. परंतु आज आपण याच शेवग्याच्या शेंगांचा वापर करून, एक अत्यंत भन्नाट आणि बनवायला सोप्या अशा मराठमोळ्या ‘शेकटवणी’ या पदार्थाची रेसिपी पाहणार आहोत.

शेवग्याच्या शेंगा आणि त्यामध्ये असणारे असंख्य पौष्टिक घटक हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. अशा शेंगांचा वापर करून बनवलेल्या शेकटवणीला काही ठिकाणी ‘कोळाच्या शेंगा’ असेही म्हटले जाते. युट्युबवरील @vmiskhadyayatra103 नावाच्या चॅनलने, या मराठमोळ्या पदार्थाचा रेसिपी व्हिडीओ शेअर केला आहे. काय आहे या आंबट-गोड शेकटवणी किंवा कोळाच्या शेंगांची रेसिपी पाहा.

शेवग्याच्या शेंगांची [Moringa] शेकटवणी

साहित्य

शेवग्याच्या शेंगा
३ वाट्या नारळाचं दूध
मोहरी
जिरे
हिंग
हळद
तिखट
कढीपत्ता
मीठ
चिंचेचा कोळ
गूळ
तेल

कृती

सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगांचे मध्यम आकाराचे तुकडे करून, त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून शेंगा वाफवून घ्या.
आता एक कढई गॅसवर ठेऊन त्यामध्ये तेल तापण्यासाठी ठेवावे.
गॅसच्या मंद आचेवर तेल तापल्यानंतर त्यामध्ये, मोहरी, जिरे घालून त्यांना छान तडतडू द्यावे.
मोहरी, जिरे तडतडल्यानंतर फोडणीमध्ये हिंग, कढीपत्ता, हळद आणि वाफवलेल्या शेंगा घालून घ्या.
सर्व पदार्थांना एकदा ढवळून, हळूहळू यात तीन वाट्या नारळाचे दूध घालून घ्यावे.
आता यामध्ये चार चमचे चिंचेचा कोळ आणि दोन चमचे गूळ घालून सर्व मिश्रण एकदा ढवळून घ्या.
नंतर थोडे तिखट आणि चवीपुरते मीठ कढईमध्ये घालावे.
सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर शेकटवणीला चांगली उकळी येऊ द्यावी.
नारळाच्या दुधाला उकळी येत असताना ते सतत ढवळत राहावे, अन्यथा पदार्थ कढईला लागण्याची शक्यता असते.
तयार झालेल्या शेकटवणीमध्ये तुम्हाला हवी असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
तयार झालेल्या या आंबट-गोड आणि पौष्टिक शेकटवणीचा, गरमागरम भाताबरोबर आस्वाद घ्यावा.

शेकटवणी बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा :

शेवग्याच्या शेंगा खूप जास्त वाफवू नका.
नारळाचे दूध सतत ढवळत राहावे.
तुमच्या आवडीनुसार हा पदार्थ अधिक आंबट किंवा अधिक गोड करता येऊ शकतो.
शेकटवणीमध्ये नारळाचे दूध जास्त झाले तरी चालेल, मात्र ते कमी पडू देऊ नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *