सुप्रिया सुळे, रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला; समोर आलं महत्त्वाचं कारण

(political news) राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट अनेकदा शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला आहे. तर सुप्रिया सुळेंपासून रोहित पवारांपर्यंत शरद पवार गटाच्या सर्वच नेत्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. एकीकडे या टीका टिप्पण्या होत असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र रोहित पवार यांनी या भेटीचे कारण स्पष्ट केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये विविध कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी सात वाजल्यापासून अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत या बैठकीसाठी आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. यावेळी पाणी प्रश्नावर या तिघांमध्ये चर्चा झाली.

काय म्हटलंय रोहित पवारांनी?

“सध्याची दुष्काळसदृष्य परिस्थिती पाहता कुकडी प्रकल्पातून 1 मार्चपासून पाणी सोडण्याच्या पाठपुराव्याला यश आले असून उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुकडी प्रकल्पातून 1 मार्च रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळं कर्जत तालुक्यातील 54 गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबाबत अजितदादा यांचे माझ्या मतदारसंघाच्यावतीने आभार! दरम्यान हे आवर्तन 40 दिवसांपेक्षा कमी असणार नाही. अन्यथा सर्व गावांना पाणी पोचणार नाही आणि लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल, हेही या बैठकीत निदर्शनास आणून दिलं. तसंच घोड प्रकल्पातूनही 1 मार्च रोजी पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शिवाय भीमा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी एप्रिलमध्ये भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार आहे. सीना धरणातही कुकडीचं पाणी सोडण्याचा मुद्दा यावेळी बैठकीत उपस्थित केला, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. (political news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *