राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हिमोफिलिया केअर सेंटर
जगातील सुमारे 8 टक्के लोकसंख्येमध्ये आतापर्यंत सुमारे 7000 ज्ञात दुर्मीळ आजार (disease) समोर आले आहेत, असे निरीक्षण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोंदवले आहे. दुर्मीळ विकारांच्या उपचार पद्धती महागड्या आहेत. हिमोफिलिया या दुर्मीळ आजाराच्या रुग्णांना मोफत आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हिमोफिलिया केअर सेंटर उभारण्यात येत आहेत.
हिमोफिलिया हा रक्ताशी संबंधित आनुवंशिक आजार असून अपुर्या प्रथिनांमुळे रक्त गोठत नाही. त्यामुळे कोणत्याही कारणाने रक्तस्त्राव सुरू झाल्यास तो थांबवणे अवघड असते. ‘हिमोफिलिया ए’ आजार 10 हजार व्यक्तींमध्ये एकाला, तर ‘बी’ प्रकारचा आजार 40 हजारांमध्ये एकाला होऊ शकतो. हिमोफिलिया ‘वाय’ गुणसूत्राच्या दोषामुळे होत असल्याने प्रामुख्याने पुरुष हे या आजाराने ग्रस्त आढळतात. मात्र, स्त्रिया या आजाराच्या (disease) वाहक असतात. राज्यात अशा आजाराचे अंदाजे 4,500 रुग्ण आहेत. हिमोफिलिया डे-केअर सेंटरची सेवा आतापर्यंत नऊ जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होती.
आता नव्याने 27 सेंटर्स कार्यान्वित झाल्याने रुग्णांना दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार आहे, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. हिमोफिलिया रुग्णांना रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्स राज्यातील सर्व जिल्ह्यांत उपलब्ध होणार आहेत.
औषधोपचार सेवा उपलब्ध
हिमोफिलिया आजाराच्या रुग्णांमध्ये रक्त गोठविणार्या फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे स्नायू, सांध्यांमध्ये, दातांमधून, नाकपुड्यातून तसेच मेंदूत रक्तस्त्राव होतो. या फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे वारंवार रक्तस्त्राव होऊ शकतो. याची औषधे इतर औषधांच्या तुलनेने महागडी आहेत. रक्तस्त्राव होत असताना रुग्णांनी प्रवास करणे धोकादायक असल्याची बाब लक्षात घेऊन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी आवश्यक असलेले फॅक्टर्स सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतला आहे.
हिमोफिलिया डे-केअर सेंटरमधील सेवा
हिमोफिलिया रुग्णांसाठी रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी क्लॉटिंग फॅक्टर्स उपलब्ध करून देणार
सांध्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि सांधे गतिशील ठेवण्यासाठी फिजिओथेरपी सेवा
हिमोफिलिया रुग्णांसाठी जीवनशैलीत बदल करण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
सांधे, मस्क्युलोस्केलेटल, दंत प्रणाली आणि उपचारांसाठी नियमित तपासणी
आजाराविषयी आरोग्य शिक्षण, जागरूकता व समुपदेशन