CSK ला धक्का! ओपनरवर शस्त्रक्रिया करावी लागणार

(sports news) इंडियन प्रीमिअर लीग २०२४, अवघ्या १८ दिवसांवर आली आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स उद्धटनीय लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. पुन्हा एकदा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याची ही शेवटची आयपीएल असल्याची हवा आहे आणि त्यामुळे व्ह्यूअर्सशीपचे सर्व रेकॉर्ड याही वेळेस मोडले जातील अशी अपेक्षा आहे. पण, त्याआधी CSK ला मोठा धक्का बसला आहे. धावांचा रतीब रचणारा त्यांच्या सलामीवीराला डाव्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे त्याला किमान ८ आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागेल आणि तो मे महिन्यापर्यंत आयपीएल खेळू शकणार नाही.

चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या विजेतेपदाचा बचाव करण्याच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे किमान मे पर्यंत आयपीएल २०२४ पासून दूर राहणार आहे. गेल्या वर्षी गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या कॉनवेच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर या आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुले त्याला किमान आठ आठवडे मैदानापासून दूर रहावे लागणार आहे. (sports news)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेदरम्यान ३२ वर्षीय कॉनवेच्या अंगठ्याला दुखापत झाली होती आणि तो कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नव्हता. वैद्यकीय सल्लामसलत केल्यानंतर त्यांच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून पूर्णपणे बरा होण्यासाठी किमान आठ आठवडे लागतील, असा अंदाज आहे. त्यामुळे आयपीएल २०२४ चा किमान निम्मा टप्पा त्याला खेळता येणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी कॉनवेचे कव्हर म्हणून पाचारण करण्यात आलेला हेन्री निकोल्स आता दुसऱ्या सामन्यासाठी संघात राहील.

डेव्हॉन कॉनवेच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड व रचीन रवींद्र ही नवी जोडी ओपनिंगला येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *