शार्दूल ठाकूरने BCCI ला सुनावलं, ‘रणजी खेळताना इतक्या…’

(sports news) रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात दुसरी सेमी-फायनल खेळवली जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरने दमदार कामगिरी केली आहे. त्याने केलेल्या तडाखेबंद फलंदाजीमुळे मुंबई संघ भक्कम स्थितीत पोहोचला आहे. शार्दूल ठाकूरने या सामन्यात शतक ठोकलं.

शतक ठोकणाऱ्या शार्दूल ठाकूरने यावेळी बीसीसीआयला एक सल्ला दिला आहे. जर असंच व्यग्र वेळापत्रक राहिलं तर एक-दोन हंगामातच खेळाडू जखमी होतील अशी भीती त्याने व्यक्त केली आहे. तीन दिवसांच्या विश्रांतीने 10 रणजी सामने खेळण्याचं वेळापत्रक म्हणजे दुखापतींना आमंत्रण देण्यासारखं आहे असं शार्दूल ठाकूर म्हणाला आहे.

शार्दूल ठाकूरचा बीसीसीआयला सल्ला

रिपोर्टनुसार, शार्दूलने सेमी-फायनल सामन्यात शतक ठोकल्यानंतर इतक्या व्यग्र वेळापत्रकात खेळणं फारच कठीण असल्याचं म्हटलं आहे. “बाद फेरीत संघ पोहोचत असताना केवळ तीन दिवसांच्या विश्रांतीने एवढे सामने खेळायला लागणं बरोबर नाही. रणजी ट्रॉफीत असं याआधी कधी झालेलं नाही. खेळाडूंना इतक्या व्यग्र कार्यक्रमाशी जुळवून घेणं जिकरीचं जातं. असं यापूर्वी कधी झालं नव्हतं,” असं शार्दूल ठाकूरने म्हटलं आहे.

जर खेळाडू अशाच प्रकारे आणखी दोन हंगाम खेळत राहिले तर दुखापतग्रस्त होतील अशी भीतीही त्याने व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, “क्रिकेटचा व्यग्र कार्यक्रम लक्षात घेता बीसीसीआयने पुन्हा एकदा याचा विचार केला पाहिजे. तसंच खेळाडूंना जास्त विश्रांती देण्याची गरज आहे. अशाच पद्धतीने खेळाडूंना आणखी दोन हंगाम खेळावे लागले तर थकण्यापेक्षा दुखापतींच्या तक्रारी जास्त वाढतील”.

शार्दूल ठाकूरने यावेळी आपल्यावेळी काय स्थिती होती हे सांगताना म्हटलं की, “माझ्या वेळचं सांगायचं झालं तर 7-8 वर्षांपूर्वी 3 सामन्यात 3-3 दिवसांचा ब्रेक असायचा. दोन सामन्यात 7 ते 8 दिवसांची विश्रांती मिळत होती. बाद फेरीत पाच दिवसांचा वेळ मिळत असे, आता क्रिकेटपटूंना प्रत्येक सामना 3 दिवसांनी खेळावा लागत आहे. जर एखादा संघ अंतिम सामन्यात पोहोचला तर खेळाडूंना 3-3 दिवसांच्या अंतराने 10 सामने खेळणं फार कठीण होईल. त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणंही अर्थहीन आहे”. तसंच इतक्या व्यग्र वेळापत्रकात एखादा जलगदती गोलंदाज जखमी झाला तर त्याला त्यातून बाहेर पडण्यास फार वेळ लागतो असंही त्याने म्हटलं. (sports news)

मुंबई संघाचे आघाडीचे फलंदाज कोलमडल्यानंतर शार्दुलने संघाची अब्रू वाचवली. शतक ठोकत त्याने संघाला 300 धावांच्या पुढे नेलं. तामिळनाडूला 64.1 षटकांत अवघ्या 164 धावांत गुंडाळल्यानंतर मुंबई संघाने 47.4 षटकांत 106 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या. यानंतर शार्दुलने 105 चेंडूत 109 धावांची खेळी खेळली. शार्दूलचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे पहिलं शतक आहे. याआधी 87 त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *