“आव्हानाची भाषा तीन महिने अगोदर केली असती तर…” – सतेज पाटील

(political news) आव्हानाला भिणारा बंटी पाटील नाही. आव्हानाची भाषा तीन महिने अगोदर केली असती तर निर्णय घेतला असता, असा प्रतिटोला आ. सतेज पाटील यांनी खा. धनंजय महाडिक यांना लगावला. महायुतीची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी बदलाची चर्चा सुरू आहे. अजून उमेदवारी अंतिम होत नाही, याचा काय तो अर्थ घ्यावा, असे सांगत शाहू महाराज यांची उमेदवारी अंतिम आहे, ती लवकरच जाहीर होईल, असेही त्यांनी सांगितले.

तीन दशकांनंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळत असताना काँग्रेसच्या नेत्यात निवडणूक लढवण्याची धमक नाही, असा टोला खा. महाडिक यांनी लगावला होता. खा. महाडिक यांनी तीन महिने अगोदर हे आव्हान दिले असते, तर विचार केला असता, निर्णय घेतला असता. आता बोलण्याला काय अर्थ आहे, असे सांगत केवळ भाजपचा पराभव हाच उद्देश डोळ्यांसमोर असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

राजाराम कारखाना निवडणूक आपण लढवू नये, अशी त्यांची इच्छा होती; मात्र आपण निवडणुकीसाठी पॅनेल करणार नाही, असे आपले काहीही नव्हते, असे स्पष्ट करत पाटील म्हणाले, आता निवडणुकीत कशाच्या जोरावर मते मागणार आहात? गॅस दरवाढ, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आंदोलन, मणिपूरचे आंदोलन अशा कोणत्या मुद्द्यांना घेऊन जनतेकडे जाणार आहात? काम चांगले असेल तर नवीन उमेदवार शोधण्याची गरज काय? नवा चेहरा हा भाजपचा विकासाचा पॅटर्न नाही, तर तो इलेक्शन पॅटर्न आहे. जुन्या कामाबद्दल कोणी विचारू नये आणि नव्याची चर्चा करून संभ—म निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही पाटील यांनी करत आता कोल्हापूरची निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे. जनता विरुद्ध महायुती अशीच ही निवडणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (political news)

हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत. त्याबाबत प्राथमिक बैठका झाल्या आहेत. सांगलीची जागा काँग्रेसकडेच असावी, अशी आमचीही इच्छा आहे; मात्र याबाबत आघाडीत योग्य निर्णय होईल. ‘वंचित’बरोबरही चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांची मुंबईत सभा आहे. त्यानंतर येत्या 4-5 दिवसांत उमेदवारांची यादी अंतिम होईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *