लेकीच्या वाढदिवसाहून परतताना कुटुंबावर काळाचा घाला
अल्टो अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गाडी ताकारी कॅनलमध्ये कोसळल्यामुळे सहा जणांना प्राण गमवावे लागले. मुलीच्या वाढदिवसाहून परत येताना कुटुंबावर काळाने घाला घातला. या भीषण अपघातात एकच महिला बचावली असून तिची प्रकृतीही गंभीर आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अल्टो अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा भयंकर अपघात झाला. तासगाव मणेराजुरी मार्गावरील ताकारी कॅनलमध्ये अल्टो कार कोसळली. अपघाताच्या वेळी या गाडीतून एकाच कुटुंबातील सात जण प्रवास करत होते. या घटनेमुळे परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
\हे सर्व नातेवाईक मुलीच्या वाढदिवसासाठी सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यातील एका गावात गेले होते. सोहळा आटपल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. तासगावच्या दिशेने येत असताना चिंचणी हाती येथे ताकारी कॅनलमध्ये अल्टो कार अचानक कोसळली.अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास प्रवास करत असल्यामुळे चालकाला थकवा येऊन झोप अनावर झाली असावी. आणि नेमकी गाडी चालवत असतानाच डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या वृत्तामुळे ज्या मुलीच्या घरुन कुटुंब वाढदिवसाचा सोहळा साजरा करुन परत येत होतं, ते शोकसागरात बुडाले आहेत.