शिरोलीत प्रचंड घबराट, मोर्चाला हिंसक वळण

पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील आर्यन हेरंब बुडकर (वय 16) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी (suicide) सिम्बॉलिक स्कूलचे अध्यक्ष गणपत जनार्दन पाटील व प्राचार्य गीता गणपत पाटील यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सर्वपक्षीय ग्रामस्थांनी मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागून संतप्त मोर्चेकर्‍यांनी शाळेवर दगडफेक केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दिवसभर तणावपूर्ण स्थिती होती. पाटील दाम्पत्याला अटक करा, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (आर्यन आत्महत्या प्रकरण)

दगडफेकीत सुरक्षारक्षकाची केबिन, इमारतीत दुसर्‍या मजल्यावरील क्लासरूम व प्रयोगशाळेच्या काचा फुटल्या. यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक प्रचंड घाबरले. दरम्यान, याच इमारतीत दहावीचा पेपर सुरू होता. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही. सरपंच शशिकांत खवरे आणि गिरीश फोंडे यांनी मोर्चेकर्‍यांना शांततेचे आवाहन करत मोर्चा ग्रामपंचायतीकडे वळविला.

दरम्यान, अटकेच्या मागणीसाठी महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. पाटील दाम्पत्याला 24 तासांत अटक झाली नाही तर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा खवरे, फोंडे यांनी दिला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी मोर्चेकर्‍यांचे निवेदन स्वीकारले. तसेच संबंधितांना तत्काळ अटक करत न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगितले.

आर्यन आत्महत्येप्रकरणी (suicide) मूक मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चा शाळेजवळ येताच हिंसक वळण लागले. काही तरुणांनी सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलवर दगडफेक करत शाळा प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.

मोर्चासाठी सकाळी अकरा वाजता शिरोली ग्रामपंचायतीसमोर सिम्बॉलिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ जमले. यावेळी गिरीश फोंडे यांनी शांततेचे आवाहन करत मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच निवेदनातील मजकूर वाचून दाखवला. त्यानंतर मोर्चास सुरुवात झाली.

आर्यन आत्महत्या प्रकरण : आर्यनला न्याय द्या

आर्यनला न्याय द्या, सिम्बॉलिक शाळा प्रशासनाचा जाहीर निषेध, अशा किती आर्यनचे बळी घेणार, सिम्बॉलिकच्या पालकांनो सावध व्हा, आपले पाल्य योग्य हाती सोपवा, संस्थाचालक गणपत पाटील व प्राचार्य गीता पाटील यांना अटक कधी होणार, अशा आशयाचे फलक हातात घेऊन हा मोर्चा गावातून शाळेसमोर आला. दहावीची परीक्षा सुरू असल्याने मोर्चाला शाळेच्या फाटकावर रोखले.

रखरखत्या उन्हात हा मोर्चा शिरोलीच्या मुख्य रस्त्याने महामार्गाच्या पलीकडे असलेल्या सिम्बॉलिक शाळेसमोर आला. प्रथम आर्यनला दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

तेथे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी शाळेच्या फाटकावर शाळा प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेला आर्यनच्या श्रद्धांजलीचा फलक काढून घ्यावा, अशी मागणी मोर्चात सहभागी तरुणांनी केली. त्यानंतर हा फलक काढण्यात आला. तरीही मोर्चातून परत जात असताना काही तरुणांनी दगडफेक केली.

या आंदोलनात सरपंच खवरे, फोंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, उपसरपंच सुरेश यादव, बाजीराव पाटील, सुभाष चौगुले, महेश चव्हाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *