जिल्ह्यात 262 पथके नियुक्त; परवानगीनेच अत्यावश्यक कामे होणार
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेची (Code of Conduct) प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. निवडणुकीसाठी विविध 262 पथकांची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होईल. अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयाच्या 100 मीटर आवारात केवळ पाच व्यक्ती आणि तीन वाहनांनाच प्रवेश देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात 85 फ्लाईंग स्क्वाड, 112 स्थिर पथके, 44 व्हिडीओ पथके तैनात करण्यात आली आहेत. याखेरीज 21 पथकांकडून विविध सभा, रॅली, भाषणे आदींची पाहणी केली जाईल. यामध्ये आक्षेपार्ह विधाने, कृती असेल तर कारवाई केली जाईल. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य सीमेवरही समन्वय ठेवला जात आहे. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील 24 तासांत सर्व राजकीय फलक काढण्याचे, झाकून ठेवण्याचे काम पूर्ण होत आले आहे. 72 तासांत सर्व फलक काढून टाकण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आचारसंहिता भंगाची नागरिकांना सीव्हिजील अॅपवर तक्रार करता येणार आहे. तक्रार दाखल झाल्यापासून 100 मिनिटांत त्याचे निराकरण केले जाणार आहे. याकरिता 24 तास जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. याकरिता नोडल अधिकार्यांचीही नियुक्ती करण्यात आल्याचे येडगे यांनी सांगितले. राजकीय पक्षांना प्रचारासाठी परवानग्या घ्याव्या लागतील. त्यासाठी तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
12 एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. यानंतर 12 ते 19 एप्रिल या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. या कालावधीत तीन दिवस सार्वजनिक सुट्ट्या आहेत. त्या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार्या केवळ पाच व्यक्तींना आणि तीन वाहनांनाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर आवारात प्रवेश दिला जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 25 हजार तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराला 12 हजार 500 रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. उमेदवारांना 95 लाखांपर्यंत निवडणुकीवर खर्च करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे आदी उपस्थित होते.
परवानगीनेच अत्यावश्यक कामे होणार
आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाल्यानंतर जी विकासकामे प्रत्यक्ष सुरू आहेत, ती सुरू राहतील. ज्यांची वर्क ऑर्डर झाली, पण काम सुरू झाले नाही ती आणि प्रशासकीय मंजुरी मिळालेली पण पुढील प्रक्रिया न झालेली कोणतीही कामे करता येणार नाहीत, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी स्पष्ट केले. पाणी टंचाई, औषध खरेदी, वैद्यकीय विभागातील अत्यावश्यक साहित्य, दुर्धर आजारावरील औषधे आदी अत्यावश्यक बाबींना आचारसंहिता कक्षाची परवानगी घेऊन कामे करण्यासाठी परवानगी दिली जाईल, असेही येडगे यांनी सांगितले.
कोल्हापूरची मतमोजणी रमणमळ्यात, तर हातकणंगलेची राजाराम तलावाजवळ
कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. कोल्हापूरची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम, रमणमळा, कसबा बावडा येथे तर हातकणंगलेची मतमोजणी राजाराम तलावावरील शासकीय गोदामात होणार आहे.