मुंबईत हाय अलर्ट! खलिस्तान समर्थक गटांकडून दहशतवादी हल्ल्याचा धोका

खलिस्तान समर्थक गटांनी आखलेल्या दहशतवादी कारवायांची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, लुधियाना न्यायालयातील बॉम्बस्फोटांशी कथित संबंध असलेल्या शीख फॉर जस्टिस संघटनेचा (SFJ) सदस्य जसविंदर सिंग मुलतानीला ताब्यात घेतल्यानंतर आणि जर्मनीत चौकशी केल्यानंतर, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये नियोजित दहशतवादी हल्ल्यांची माहिती मिळाली होती.याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला माहिती मिळाली आहे की एसजीएफ व्यतिरिक्त, इतर प्रतिबंधित खलिस्तान समर्थक गट मुंबई, दिल्ली आणि इतर शहरांमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या संपर्कात आहेत.”
शीख फॉर जस्टिस या संघटनेवर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला असून सतर्क राहण्यास आणि संशयास्पद हालचालींकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.
तर, मुंबई पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रॅपिड अॅक्शन टीम आणि बॉम्ब शोधक पथकाला सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *