जिल्ह्यात चिंतेचे सावट, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांच्या (crushed dogs) दहशतीमुळे चिंतेचे सावट असतानाच शनिवारी (दि. 16) रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत कोल्हापूर शहरात आठ तर जिल्ह्यात 12 जणांना कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले. या घटनेमुळे जखमींसह नातेवाईकांची तारांबळ उडाली होती. चावा घेतलेल्या जखमींसह नातेवाईकांची रविवारी सकाळी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात गर्दी झाली होती. रेबीजच्या इंजेक्शनानंतर काही रुग्णांना घरी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पंधरा दिवसांपासून कुत्रे चावलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचेही वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. शनिवारी रात्रीपासून कोल्हापूर शहर, उपनगर 8, मोरेवाडी 1, कुडित्रे परिसर 2, गगनबावडा 2, शिये 3, उचगाव 2, केर्ली 1 अशी कुत्रे चावलेल्या रुग्णांची संख्या असल्याचे सांगण्यात आले.
भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट
शहरासह उपनगरामध्ये मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा (crushed dogs) अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. रात्री दहानंतर मध्यवर्ती चौक व मार्गावर कुत्र्यांच्या झुंडी दिसून येतात. अचानक पाठलाग करून हल्ल्याचे प्रकार वाढल्याने वाहनधारकांसह महिला विशेष करून शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
युवतीच्या मृत्यूनंतर चिमुरडाही गंभीर जखमी
मोकाट कुत्र्याने केलेल्या हल्ल्यातील जखमी तरुणी श्रृष्टी सुनील शिंदे (वय 21, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (दि. 4) ही घटना घडली होती. या घटनेनंतरही हॉकी स्टेडियम – रामानंदनगर रोडवर महिलेसह दोघांवर कुत्र्याने हल्ला केला. शनिवारी (दि. 16) येथील नवनिर्माण चौकातील मैल खड्ड्याजवळ भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात सहा वर्षाचा चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे.