कर्नाटकी गुळाची ‘कोल्हापुरी गूळ’ नावाने विक्री?

कर्नाटकात तयार झालेल्या गुळाची ‘कोल्हापुरी गूळ’ असा शिक्‍का मारून विक्री केली जात असल्याचे शनिवारी उघडकीस आले. काही संधिसाधू व्यापार्‍यांमुळे कोल्हापुरातील गूळ (jaggery) उद्योगच धोक्यात आला आहे.

कर्नाटकी गुळाची ‘कोल्हापुरी गूळ’ नावाने विक्री होत असल्याचे शेतकरी गेली दोन वर्षे शेतकरी संघटना बाजार समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणत आहेत. पण त्यावर अद्याप ठोस कारवाई झालीच नाही. जुजबी कारवाईमुळे हा प्रकार वाढू लागला आहे. हा प्रकार वेळीच रोखण्यासाठी समिती प्रशासनाने खंबीर पावले उचलण्याची गरज आहे.

सरकारने शेतीमाल विक्रीचा बाजार खुला केला आहे. त्यामुळे शेतकरी आपला शेतीमाल कुठेही विक्री करू शकतो, त्याचप्रमाणे व्यापारीही कुठेही तो खरेदी करू शकतो. मग गूळ बाहेर खरेदी करण्यावर बंधने घालण्याची गरज काय, असा सवाल काही गूळ व्यापार्‍यांकडून केला जात आहे. पण ज्या राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरची गूळ बाजारपेठ समृद्ध व्हावी, येथील गूळ उत्पादक शेतकर्‍यांना चार पैसे जादा मिळावेत, म्हणून ही बाजारपेठ उभी केली.

शेतकर्‍यांचा गूळ खरेदी करण्यासाठी गुजरातहून व्यापार्‍यांना बोलावून आणून त्यांचे येथे बस्तान बसावे म्हणून यार्डातील जागा दिल्या, व्यवसाय करा म्हणून प्रोत्साहित केले. यामागे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला गूळ येथे खरेदी करून त्याची विक्री केली जावी, हा यामागील उद्देश होता. या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम काही व्यापार्‍यांकडून सुरू असल्याचे उघड झाले आहे.

जीआय मानांकनाचा प्रभाव कधी?

कोल्हापुरी गुळाचा (jaggery) देशात पूर्वापार लौकिक आहे. हा लौकिक कायम राहावा व येथील शेतकर्‍यांच्या गुळाला जादा दर मिळावा, यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्‍न बाजार समितीने कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन घेतले आहे. पण या मानांकनाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा फायदा व्यापारी वर्गाकडून उठवला जात असल्याचे शनिवारी उघड झाले.

प्रशासनाचे दुर्लक्ष

शनिवारची घटना कर्नाटकातील गूळ रवे भरून कर्नाटक पासिंगचे ट्रक मार्केट यार्डात आल्यानंतर उघडकीस आली आहे. पण काही व्यापारी हे महाराष्ट्राचे पासिंग असलेल्या ट्रकमध्ये कर्नाटकातून गूळ रवे खरेदी करून त्यावर कोल्हापुरी गुळाचे शिक्के मारून पाठवितात. याबाबतही समितीतील व्यापारी बोलत आहेत. या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणीही व्यापार्‍यांकडून केली जात आहे. पण समिती प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

1250 जिल्ह्यात 2003 पर्यंत गुर्‍हाळघरे होती कार्यरत
2.75 कोटींची मागील वर्षी बाजार समितीत उलाढाल
350 2020 पर्यंत गुुर्‍हाळघरे राहिली शिल्‍लक
252 सध्या जिल्ह्यात सुरू असलेली गुर्‍हाळघरे
395 2019 मध्ये बाजार समितीने केलेल्या सर्वेत जिल्ह्यातील गुर्‍हाळघरे
5,500 लोकांना थेट रोजगार उपलब्ध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *