शेंडा पार्क परिसरात सापडले तीन तोफगोळे
शहराच्या दक्षिण-पूर्व भागातील शेंडा पार्क परिसरात असणार्या साळोखेनगरच्या माळावर तीन लोखंडी तोफगोळे (Cannonballs) सापडले आहेत. यामुळे या परिसराबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, हे तोफगोळे राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या लक्ष्मी विलास पॅलेस (कसबा बावडा) येथील वस्तुसंग्रहालयाकडे जमा करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर परिसरातील वृक्षप्रेमी अमर गणपतराव संकपाळ यांना 8 सप्टेंबर रोजी वृक्षारोपणासाठी मातीसाठी खोदकाम करताना मातीत रुतलेले हे तीन तोफगोळे सापडले. सुरुवातीला त्यांना हे गोळे गोळाफेक खेळाचे असावेत असे वाटले होते. त्यांनी याबाबतची माहिती वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुढ्ढे व दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार संकपाळ यांनी हे तोफगोळे पुरातत्त्व खात्याकडे सुपूर्द केले. तोफगोळे (Cannonballs) मिळाल्याचे पत्र पुरातत्त्व विभागाने संकपाळ यांना दिले आहे.
असे आहेत तोफगोळे
या तीन लोखंडी तोफगोळ्यांचे वजन 3 किलो 290 ग्रॅम, 3 किलो 206 ग्रॅम व 3 किलो 168 ग्रॅम असे आहे. हे तोफगोळे कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस (राजर्षी शाहू जन्मस्थळ) येथील संग्रहालयात लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. हे तोफगोळे साधारणत: 1850 सालचे असावेत, असा अंदाज इतिहास अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी व्यक्त केला आहे.