जिल्ह्यात अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी यंदा मोठी चुरस!

अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा राज्यभरातून सुमारे 1 लाख 30 हजार अर्ज आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यात 20 टक्क्यांनी वाढ झाल्याने यंदा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा (student) कस लागणार असून मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरकडे मागील काही वर्षांत विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याने बहुतांश महाविद्यालयात प्रवेश जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले होते. कोरोनानंतर यावर्षी अभियांत्रिकी प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज संस्थांनी व्यक्त केला आहे. राज्यात पदवी अभियांत्रिकीसाठी सुमारे 1 लाख 32 हजार प्रवेश क्षमता आहे. मात्र, यावर्षी 2 लाख 31 हजार इतक्या विक्रमी संख्येने पदवी अभियांत्रिकीच्या ‘सीईटी’ परीक्षेसाठी विद्यार्थी बसले होते. सध्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 लाख 29 हजार 249 प्रवेश अर्ज ‘सीईटी’ सेलकडे प्राप्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांतील ही संख्या उच्चांकी असून 20 टक्क्यांनी प्रवेश अर्जात वाढ झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता 6 हजार 500 प्रवेश क्षमता असून आतापर्यंत सुमारे 7 हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशासाठी मोठी चुरस बघायला मिळणार आहे. मागील दोन वर्षांत सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांना (student) चौथ्या वर्षामध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाकडे पालक, विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला दिसून येतो.

कट ऑफ वाढण्याची शक्यता

यावर्षी विद्यार्थ्यांचा कल संगणक व आयटी अभियांत्रिकी किंवा त्याच्याशी निगडित विद्या शाखांकडे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या शाखांचा कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. बरेच विद्यार्थी चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालये निवडून तेथील सोयी-सुविधा, अभ्यासक्रम निवडताना दिसत आहेत. 12 ऑक्टोबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर 13 ते 15 ऑक्टोबरदरम्यान पहिल्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *