आयुष’ रुग्णालयाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार : डॉ. प्रमोद सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी गोव्यात येत असून त्यांच्या हस्ते धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान व संशोधन केंद्राचे उद्घाटन होणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे गोव्यात आयोजित 9 व्या जागतिक आयुर्वेदिक परिषदेच्या समारोप सोहळ्याला संबोधित करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी, दि.28 रोजी आल्तिनो येथील कर भवनामध्ये सरकारी अधिकार्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अखिल भारतीय इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाच्या धारगळ येथे होणार्या उद्घाटन सोहळ्याचे तसेच पणजीत होणार्या जागतिक आयुर्वेदिक परिषद समारोप सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीला पोलिस प्रमुख जसपाल सिंग तसेच विविध खात्याचे प्रमुख उपस्थित होते. उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांच्या सोबत आयुष खात्याचे सचिव राजेश कोटेचा हेही यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले, की पंतप्रधानांच्या गोवा भेटीचा व त्यांच्या दोन कार्यक्रमांची तयारी करण्यासाठी सोमवारी झालेल्या बैठकीत सर्वांना जबाबदारी वाटून देण्यात आली. 11 रोजी दुपारी 2 वा. पंतप्रधान मोदी हे धारगळ येथील आयुर्वेद संस्थांचे उद्घाटन करतील. तर संध्याकाळी 4.30 वाजता कांपाल येथील मैदानावर जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप सोहळ्यात भाग घेतील. गोव्यात होणार्या जागतिक आयुर्वेद परिषदेसाठी 4500 ते 5000 प्रतिनिधींची नोंद सध्या झालेली असून सिंधुदुर्ग, गोवा आणि कारवार येथील सुमारे 1 लाख लोक या प्रदर्शनाला भेट देण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 37 देशाचे 248 स्कॉलर या परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गोव्यासाठी आयुष इस्पितळ ही मोठी भेट दिलेली असल्याचे सांगून मोप विमानतळ आणि झुआरी पुलाच्या उद्घाटनाबाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धारगळ येथे ओपीडी सुरू
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये ओपीडी आणि आयपीडी सुरू करण्यात आलेली आहे. तेथे सुपर स्पेशालिटी डॉक्टर उपलब्ध करण्यात आलेले असून, गोव्यातील ज्या नागरिकांना आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत त्यांनी धारगळच्या आयुर्वेद संस्थेला भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. आयुर्वेदिक संस्थेच्या परिसरामध्ये युनानी व इतर विविध उपचार पद्धतीचे विभाग स्थापन करण्यात आल्याचे ते म्हणाले.