ज्योतिरादित्य शिंदे राबवणार पंचगंगा शुद्धीकरण योजना
पंचगंगा शुद्धीकरण योजना (Scheme) राबवणार असल्याचे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पंचगंगा नदीचे प्रदूषण होत आहे. ते नेमके कशामुळे होते, याचा अभ्यास करून प्रदूषणाचे स्रोत निश्चित केले आहेत. नागरी वस्तीतील सांडपाणी तसेच औद्योगिक वापराचेे सांडपाणी, यामुळे प्रदूषण होते. त्या प्रत्येक विभागाला प्रदूषण रोखण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्या-त्या विभागांतून निधी मिळवून दिला जाईल, असेही शिंदे म्हणाले.
नव्या ड्रेनेज योजनेला फेब्रुवारीअखेर मान्यता
अमृत सरोवर योजनेच्या (Scheme) दुसर्या टप्प्यात शहराच्या नव्या ड्रेनेज लाईनचे काम केले जाईल. त्यासाठी साठ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला फेब—ुवारीअखेर प्रशासकीय मान्यता मिळेल, असे सांगत शिंदे म्हणाले, पहिल्या टप्प्यातील शिल्लक राहिलेल्या 50 कि.मी.चे काम मार्चअखेर पूर्ण होईल. त्याचा दर आठवड्याला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. थेट पाईपलाईनचे काम गतीने पूर्ण केले जाईल. जिल्ह्यातील 17 तलावांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
पर्यटन, औद्योगिक विकास
कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. यामुळे कोल्हापूर राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाले पाहिजे. त्याद़ृष्टीने कोल्हापूरचा पर्यटन आणि औद्योगिक विकास केला जाईल, असेही शिंदे म्हणाले. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची आपल्यावर जबाबदारी दिली आहे. त्यामुळे दर महिन्याला आपण येऊन विकासकामांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.