कोल्हापुरच्या नादखुळ्या डिशनं बच्चे कंपनी झाली खुळी
पाणीपुरी म्हटलं की बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी येतं मग याच पाणीपुरीच्या डिशमध्ये जर वेगळेपण मिळत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच गर्दी होत असते. मात्र, कोल्हापुरातील अशाच एका पाणीपुरीच्या स्टॉलवर सध्या बच्चे कंपनीची गर्दी होताना दिसत आहे. इथे मिळणारी चॉकलेट (Chocolate) पाणीपुरी लहान मुलांना बरीच पसंतीस पडत आहे.
कशी झाली सुरुवात?
कोल्हापुरातील रंकाळा तलाव परिसरातील खराडे कॉलेजच्या जवळ अश्विनी उमेश सावंत यांचा पाणीपुरीचा स्टॉल आहे. त्यांचे पती कोल्हापुरातच एका बँकेत काम करतात. माहेरी वडील आणि भाऊ आचारीकाम करत असल्यामुळे अश्विनी यांना विविध पदार्थ बनवून दुसऱ्यांना खायला घालण्याची आवड लागली. त्यामुळेच आजवर त्यांनी बऱ्याच प्रदर्शनांमध्ये पाणीपुरी, दाबेली, स्प्रिंग पोटॅटो असे पदार्थ विकले आहेत. मात्र प्रदर्शनात येणाऱ्या खवय्यांना त्यांच्या हातचे पदार्थ इतके आवडायची की ते अश्विनी यांच्या दुकानाचा पत्ता मागायचे. ग्राहकांच्या मागणीमुळेच अश्विनी यांनी रंकाळा तलावाशेजारी छत्रपती स्नॅक नावाने पाणीपुरी विकायला सुरुवात केली.
अश्विनी यांच्या या पाणीपुरीच्या स्टॉलला जवळपास दोन महिने झाले आहेत. तर आतापर्यंत ग्राहकांना येथील पाणीपुरीची चव देखील त्यामुळे दिवसाला साधारण दीडशे ते दोनशे प्लेट पाणीपुरी तसेच इतर पदार्थ देखील त्यांच्याकडे विकले जातात. यातच वेगळेपण आणि मुलांसाठी म्हणून त्यांनी चॉकलेट (Chocolate) पाणीपुरी सुरू केली. त्याचबरोबर आठवड्यातील दोन दिवस त्या खवय्यांसाठी खास अनलिमिटेड पाणीपुरी देखील विकतात.
कशी सुचली चॉकलेट पाणीपुरीची कल्पना?
अश्विनी जेव्हा प्रदर्शनात दाबेली विक्री करत होत्या. त्यावेळी काहीतरी पाणीपुरीत देखील वेगळं काहीतरी करता येईल, हा विचार केला. तसेच लहान मुले पाणीपुरी खाताना फक्त गोड पाणीपुरी जास्त खातात. त्यामुळे त्यांच्यासाठी खास म्हणून चॉकलेट पाणीपुरी सुरू केली, असे अश्विनी सांगतात.
काय आहे चॉकलेट पाणीपुरी ?
पाणीपुरी मध्ये साधारणतः पुदिन्याचे हिरवे पाणी आणि चिंच खजुराची लाल पाणी वापरले जाते. त्याचबरोबर बटाट्याचा रगडा, तिखट/साधी बुंदी, भिजवलेले हरभरे, शेव आदी सगळे घटक पुरीमध्ये भरले जात असतात. मात्र चॉकलेट पाणीपुरी मध्ये या सगळ्या घटकांऐवजी अश्विनी यांनी वेगळेच घटक वापरलेत. पुरीमध्ये त्यांनी काजू-बदाम असे ड्रायफ्रूट असणारा मिल्कशेक, रेनबो स्प्रिंकल भरले. तर पुरीवर शेव टाकण्या ऐवजी त्यावर लिक्विड चॉकलेट वापरले आहे. त्यामुळे ही गोड चवीची चॉकलेट पाणीपुरी लहान मुले आवडीने खातात.
आठवड्यात 2 दिवस अनलिमिटेड पाणीपुरी
अश्विनी यांच्याकडे आठवड्यातून गुरुवार आणि शनिवार या दोन दिवशी अनलिमिटेड फक्त 49 रुपयांमध्ये पाणीपुरी देखील मिळतात. या ऑफरमुळे कोणी 50 कोणी 60 तर कोणी 100 पाणीपुरींचा आस्वाद देखील बरेच जण घेत असतात.
अगदी सोप्या पद्धतीनं घरीच बनवा चैत्रातील आंबेडाळ, पाहा Recipe Video
किती रुपये आहे पाणीपुरीची किंमत ?
अश्विनी यांच्याकडे मिळणारी साधी पाणीपुरी 20/- रुपये, शेवपुरी 30/-, दहीपुरी 40/-, चॉकलेट पाणीपुरी 40/- तर गुरुवारी आणि शनिवारी अनलिमिटेड पाणीपुरी 49 रुपयांना मिळतात.
कुठं खाल पाणीपुरी?
खराडे कॉलेजच्या गेटजवळ, रंकाळा तलाव परिसर, सी वॉर्ड, शिवाजी पेठ, कोल्हापूर – 416012
संपर्क (अश्विनी सावंत) : 7875786267