कोल्हापूर : ‘या’ नेत्याला मिळणार निष्ठेचं फळ, लोकसभेसाठी तीन नावं चर्चेत
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Election) महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, शिवसेना व शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी एकत्र आल्यास कोल्हापूरची जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत शिवसेनेकडे (Shiv Sena) निष्ठावंताला उमेदवारी देण्याची मागणी होत असली तरी प्रबळ, ताकदीचा उमेदवार म्हणून माजी आमदार संजय घाटगे (Sanjay Ghatge) हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार ठरू शकतात. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरे घराण्याचे निष्ठावंत म्हणून उमेदवारी मिळवलेले संजय पवार यांचेही नाव उमेदवारीच्या यादीत आघाडीवर आहे.
काल मुंबईत झालेल्या बैठकीतील या दोघांची उपस्थिती याचाच भाग आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे दुसरे आमदार अशी संजय घाटगे यांची ओळख आहे. १९९८ साली कागलच्या पोटनिवडणुकीत ते पहिल्यांदा विजयी झाले. पण त्यानंतरच्या पाचही निवडणुका त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारख्या दिग्गजाविरोधात जिद्दीने लढवल्या.
यातील दोन निवडणुकींचा अपवाद वगळता ते शिवसेनेचे उमेदवार (Sanjay Pawar) राहीले आहेत. यात पराभव झाला असला तरी ‘लढवय्या’ अशी त्यांनी आपली ओळख कायम ठेवली आहे. अजातशत्रू, शून्य उपद्रव्यमूल्य व सर्वपक्षीयांशी चांगले संबंध ही त्यांच्यादृष्टीने जमेची बाजू आहे.
सद्यस्थितीत दोन्ही काँग्रेससह, फुटीर राष्ट्रवादी, भाजप व ठाकरे गटाकडे लोकसभेसाठी ताकदीचा उमेदवार नाही. विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक शिंदे गटाकडे गेल्याने ते याच गटाचे किंवा ऐनवेळी भाजपचे उमेदवार होऊ शकतात. दुसरीकडे ‘महाविकास’ मध्ये जागाच ठाकरे गटाला गेली तर उमेदवार कोण? हा मोठा पेच आहे.
अशा परिस्थितीत काँग्रेससह शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीला मान्य असा चेहरा म्हणूनही घाटगे यांचे नाव पुढे येऊ शकते. पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्त्व असलेल्या कागलमध्ये संजय घाटगे- मुश्रीफ मैत्री सर्वश्रुत आहे. विधानसभेला मुश्रीफ यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.
त्यातच मुश्रीफ यांनी अलिकडेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडून वेगळा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत लोकसभेला प्रा. मंडलिक भाजपचे उमेदवार असतील तर विधानसभेच्या बदल्यात मुश्रीफ गटांकडून घाटगे यांना मदत होण्याची शक्यता अधिक आहे. विधान परिषद आणि ‘गोकुळ’च्या राजकारणातील संजय घाटगे यांचे महत्व लक्षात घेता कोल्हापूर उत्तरसह करवीर व दक्षिणमध्ये वर्चस्व असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचीही त्यांना साथ मिळेल.
काँग्रेसचे करवीरचे आमदार पी. एन. पाटील व घाटगे यांच्यातील मैत्रीचाही त्यांना फायदा होऊ शकतो. राधानगरी-भुदरगड व चंदगडमध्ये काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची साथ त्यांना मिळेल. या दोन मतदारसंघात सतेज पाटील व पी. एन. पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. या सर्व ताकदीच्या जोरावर घाटगे लोकसभेला आव्हान उभे करू शकतात.
ठाकरे यांच्या ‘गुडबुक’मध्ये संजय पवार
राज्यसभेच्या निवडणुकीत (Election) कोणाच्या ध्यानीमनी नसताना उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. यावरून पवार हे ठाकरे यांच्या ‘गुडबुक’ मध्ये असल्याचे दिसून येते. शिवसैनिकांची मागणी आणि स्थानिक परिस्थिती पाहता पक्षाकडून पवार यांच्याही नावाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळू शकतो.
घाटगेंची तयारी सुरू
वातावरणाचा अंदाज घेत संजय घाटगे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनीही या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विशेषतः कागल तालुक्यात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घाटगे यांच्यासाठी निधी संकलनापासून ते तयारीचे मेसेज व्हायरल केले जात आहे. ‘आता पर्याय ‘बाबा’च’ अशा आशयाचे संदेशही समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागले आहेत.