कोल्हापूर : गर्भलिंग निदान एजंटांसह रॅकेट सुसाट
वंशाला दिवा मुलगाच हवा, या हट्टापायी जिल्ह्यात गर्भलिंग निदान (Pregnancy diagnosis) आणि स्त्री भू्रणहत्या करणार्या सक्रिय टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे. जानेवारी 2023 मध्ये राधानगरी, भुदरगड तालुक्यात दोन टोळ्यांना तुरुंगाची हवा दाखविण्यासाठी स्टिंंग ऑपरेशन करण्यात आले. पूर्वी ग्रामीण भागात राजरोस चालणार्या या कृत्यांचे लोण शहरी भागातही पसरले आहे. परिणामी, कोल्हापूर स्त्री जन्मदरात मागे आहे.
देशात सर्वाधिक मुलींचे प्रमाण कमी असणारा पन्हाळा तालुका आहे. त्यामुळे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देत नानाविध प्रकारच्या योजना करणार्या शासनालाच या टोळ्या खुले आव्हान देत आहेत. ज्या प्रमाणात गर्भलिंग निदान होत आहे. त्या तुलनेत केली जाणारी कारवाई प्रातिनिधिक स्वरूपातील आहे.
जिल्ह्यात स्त्रीजन्मदराचे सरासरी प्रमाण हे 1000 मुलांमागे 930 इतके आहे. पन्हाळा तालुक्यात हेच प्रमाण केवळ 827 इतके आहे. 2011 च्या जनगणनेनुसारचे हे चित्र आहे. नवीन जनगणना झाल्यास भयानक चित्र समोर येण्याची शक्यता आहे. गेल्या कांही वर्षात गर्भलिंग निदान (Pregnancy diagnosis) करणे आणि स्त्री भ्रूण ह्त्या करणारे रॅकेट वाढल आहेत. यामध्ये काही बोगस डॉक्टर आणि त्यांना कनेक्ट असणारे एजंट, दलालांचा पदार्फाश करण्यात आरोग्य विभागाच्या टीमला यश आले आहे. एकेका सोनाग्राफी सेंटरकडे डझन, दोन डझन दलाल कनेक्ट असल्याने मोठ्या प्रमाणात आजही स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत.
हे प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण विभाग आणि शहरी विभाग असे दोन समित्या शासनाने स्थापन केल्या आहेत. एक समिती जिल्हाधिकारी तर दुसरी समिती महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असते. या समितीपैकी जिल्हा आरोग्य विभागाने 2008 पासून आत्तापर्यंत म्हणजे 15 वर्षात 10 ठिकाणी खटले दाखल केले. यापैकी 4 प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. 3 प्रकरणात न्यायालयाने पीसीपीएनडी कायद्यांतर्गत शिक्षा ठोठावली आहे. तर 3 प्रकरणातातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. शहरी भागात कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने 7 ठिकाणी 7 केसेस दाखल केल्या. सर्वच प्रकरणात महापालिकेच्या विरोधात निकाल गेले. एकालाही शिक्षा झाली नाही.
गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या करणारी यंत्रणा निर्ढावली आहे. कारवाई झाली तरी ते थांबत नाहीत. ऐनकेन प्रकारेन ते ही कृत्ये करतात. कारवाई झाल्यानंतर त्यांचा रेट वाढतो. सोनोग्राफी मशिन बंद-सुरूचा खेळ केला जातो. कित्येकदा गर्भलिंग निदान करणे आणि स्त्री भ्रूणहत्या करणे हे महिलेच्या जीवावर बेतण्याचीही शक्यता असते.