भाजपने फिरविली भाकरी; निष्ठावंतांना मिळाली संधी
(political news) आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपने नगर जिल्ह्यात भाकरी फिरवत निष्ठावंतासह प्रभावी नेत्यांच्या मर्जीतील जिल्हा पदाधिकारी नियुक्त करत समतोल साधला. नगर शहर जिल्हाध्यक्षपदी अॅड. अभय आगरकर, दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग, तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव लंघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. आगरकर हे संघाशी निगडित असून लंघे हे विखे समर्थक आहेत, तर भालसिंग हे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे समर्थक आहेत.
नगर शहर जिल्हाध्यक्ष असलेले महेंद्र गंधे यांना नगर शहर विधानसभेचे समन्वयक म्हणून संधी दिल्याने त्यांच्या जागी आगरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर जिल्हाध्यक्षपदाचे खांदेपालट करत राजेंद्र गोंदकर यांच्याऐवजी विठ्ठलराव लंघे यांना संधी देण्यात आली आहे. दक्षिण जिल्हाध्यक्ष असलेले अरुण मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीवर संधी मिळाल्याने त्यांच्या जागी दिलीप भालसिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्षपद निवडीसाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नगर व शिर्डीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेत मते आजमावत मुलाखतीही घेतल्या होत्या. बावनकुळे यांच्या निवडीनंतर कोणत्याही क्षणी नवीन नियुक्ती होण्याची शक्यता पाहता इच्छुकांनी प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या गाठीभेटी घेत या पदासाठी फिल्डिंग लावली होती. महेंद्र गंधे, अरुण मुंडे यांनी पुन्हा संधी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी समतोल साधत नियुक्तीची घोषणा केली.
आगरकर हे भाजपचे निष्ठावंत असून ते संघाशी निगडित आहेत. 2014 मध्ये त्यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. यापूर्वीही त्यांच्याकडे शहराध्यक्ष पद होते. आता पुन्हा त्यांनाच नगर शहर जिल्हाध्यक्षपदाची संधी देत भाजपने नगर शहरात आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेचे राजकारण केल्याचे दिसते.(political news)
उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केलेले लंघे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून यापूर्वीही ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. विखे यांच्या मर्जीतील नेते म्हणून लंघे यांच्याकडे पाहिले जाते. दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झालेले दिलीप भालसिंग हेही भाजपचे निष्ठावंत आहेत. कर्डिले यांचे समर्थक असले तरी भालसिंग यांच्या रूपाने भाजपने नव्या चेहर्याला संधी दिली आहे.