रुकडीत मशरूमच्या भाजीतून विषबाधा
रुकडी (ता. हातकणंगले) येथील रुकडीवाडीत जेवणातील मशरूममधून नऊ जणांना विषबाधा (poisoning) झाली. हा प्रकार शनिवारी (दि. २२) रात्रीच्या जेवणानंतर घडला. उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू होताच सर्व बाधितांना सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारानंतर सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
रजिया गुलाब पठाण (वय५५), इब्राहिम गुलाब पठाण (वय ३५), नझरिन सद्दाम नदाफ (वय २७), नलिमा गुलाब नदाफ (वय ६५), मुमताज इस्माईल नदाफ (वय ४५), मुसबा सद्दाम नदाफ (वय ९), मिसबा सद्दाम नदाफ (वय ८), जन्नत इर्शाद शेख (वय ३५) आणि फारूख इर्शाद शेख (वय २२, सर्व रा. रुकडीवाडी, रुकडी) अशी विषबाधितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रुकडी येथील नदाफ कुटुंबीयांनी शनिवारी रात्री शेतातून आणलेल्या मशरूमची भाजी केली होती. जेवणानंतर रात्री दहाच्या सुमारास सर्वांना मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. गावातील खासगी रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा (poisoning) झाल्याचे सांगत रुग्णांना सीपीआरमध्ये पाठवले. त्यानुसार सर्व नऊ विषबाधितांना सीपीआरमध्ये दाखल केले. वेळीच उपचार झाल्याने बाधितांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.