कोल्हापूर जिल्ह्यातील 6 कारखान्यांचा तीन हजारांपेक्षा जादा दर
राज्यातील 211 सहकारी आणि खासगी कारखान्यांपैकी 13 साखर कारखान्यांनी (sugar factories) गतहंगामामध्ये तीन हजारांपेक्षा जास्त दर दिला; तर 12 कारखान्यांनी दोन हजारांपेक्षा कमी दर दिला. तीन हजारांपेक्षा जास्त दर देणार्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती, बिद्री, कुंभी, पंचगंगा, वारणा, दालमिया या सहा कारखान्यांचा समावेश आहे.
यावर्षीचा हंगाम सुरू होण्यास काही दिवस उरलेले असताना, काही कारखान्यांनी अद्यापही उसाची पूर्ण एफआरपी दिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, गतहंगामामध्ये राज्यातील 211 सहकारी, खासगी कारखान्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी 13 साखर कारखान्यांनी तीन हजारांपेक्षा जादा दर दिला, तर 12 कारखान्यांनी दोन हजारांपेक्षा कमी दर दिला आहे.
तीन हजारांपेक्षा जास्त दर देणार्या कारखान्यांमध्ये (sugar factories) सर्वाधिक कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. यामध्ये भोगावती (3,094.41), दूधगंगा (बिद्री) (3,089.55), कुंभी (कुडित्रे) (3,150), पंचगंगा (इचलकरंजी) (3,103.50), वारणा साखर (3,024.60), दालमिया (3,177.79). सांगली जिल्ह्यातील राजारामबापू (3,105.57), युनिट-2 (3,104.29), युनिट-3 (3,105.76), सोनहिरा कारखाना (3,167.72), जी. डी. लाड कारखाना (3,101.22), दालमिया भारत (3,027.88), तर सातारा जिल्ह्यातील कृष्णा (रेठरे) (3,023.61) या कारखान्यांचा समावेश आहे. तब्बल 198 कारखान्यांनी तीन हजारांपेक्षा कमी दर दिला आहे.
किती मिळतात पैसे…
दरवर्षी केंद्र सरकारकडून उसाचा उतारा निश्चित करून एफआरपीची रक्कम जाहीर केली जाते. उतारा वाढेल किंवा कमी होईल, त्यानुसार बदलही होतात. शासनाने जाहीर केलेल्या एफआरपीमधून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा करून शेतकर्यांना रक्कम अदा केली जाते.