कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकच्या काही भागांत मोठे संकटं निर्माण होण्याची शक्यता!
दक्षिण भारताला (South India) पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांशी नद्या (Rivers) या पश्चिम घाटात उगम पावतात; मात्र गेल्या काही वर्षांत अनेक कारणांनी या नद्यांची उगमस्थाने (Origins) धोक्यात आली आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकच्या काही भागांतील सुमारे २८ नद्यांची उगमस्थाने धोक्यात आहेत.
त्यामुळे नद्यांच्या उगमस्थानांच्या आसपास असणाऱ्या वायंगणीमधील शेतीही संपत आहे. याबरोबरच भूगर्भातील जलप्रवाहांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झालेला आहे. पश्चिम घाटातील डोंगरात अनेक नद्या उगम पावतात. पुढे त्या डोंगर, कडे-कपाऱ्या ओलांडून मैदानी प्रदेशात येतात.
तेथून त्यांचा प्रवास कर्नाटक, आंध्र प्रदेश असा होत पुढे एखाद्या मोठ्या नदीला मिळून संपतो. मात्र, या नद्या दोन ते तीन राज्यांतील शेतीसह उद्योगाला पाणी पुरवठा करतात. दक्षिण भारताची पाण्याची गरज पूर्ण करण्यामध्ये या नद्यांचे मोठे योगदान आहे. नदीच्या उगमाच्या ठिकाणी भूगर्भांतर्गत पाण्याचे प्रवाह असतात. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, नैसर्गिक भूरूपात केलेले बदल यांमुळे अंतर्गत प्रवाह कोरडे पडले असल्याचे धक्कादायक चित्र दिसते.
नदीच्या पात्रातील वायंगणी शेती केली जाते. ती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उगमाजवळचे प्रवाह आटल्याने पुढच्या भागातील प्रवाह कोरडे पडत आहेत. मोठ्या नद्यांच्या उपनद्यांनाही हा धोका जाणवत आहे. नद्यांची उगमस्थाने (Origins) धोक्यात आली असून भविष्यात हे संकट अधिक भीषण स्वरूप धारण करेल, असा कयास आहे.
नद्यांची उगमस्थाने धोक्यात येण्याची कारणे
नैसर्गिक अनुकूलतेचा विचार न करता बांधलेले रस्ते.
फार्म हाउस बांधण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी डोंगर उतारांचे सपाटीकरण.
अनियंत्रित खाणकाम.
पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड.
नद्यांच्या उगमाच्या भागात झालेली अतिक्रमणे.
पश्चिम घाटात असंख्य नद्यांची उगमस्थाने आहेत. यातील काही नद्या आकाराने जरी लहान असल्या, तरी स्थानिक पाणीपुरवठा आणि पर्यावरणीय समतोल साधतात, या दृष्टीने त्या महत्त्वपूर्ण आहेत. पश्चिम घाटात भ्रमंती करताना नद्यांची उगमस्थाने धोक्यात आल्याचे सार्वत्रिक चित्र दिसून आले. हे भविष्यातील फार मोठे संकट आहे. त्यामुळे आताच निसर्गानुकूल विकासाचे धोरण निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी.
-डॉ. अमर अडके, ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक
वायंगणी म्हणजे काय?
नदीचे उगमस्थान जरी एखाद्या विशिष्ट ठिकाणी दर्शवले जात असले तरी प्रत्यक्षात त्या परिसरात भूगर्भात जलप्रवाहाचे जाळे असते. त्यातील एका किंवा अधिक ठिकाणी प्रवाह जमिनीतून पृष्ठभागावर येतो. तेथून नदीचा दृश्य स्वरूपातील प्रवाह सुरू होतो. मात्र, जे भूगर्भात प्रवाह असतात तेथे हाताने उकरले तरी पाणी पृष्ठभागावर येते. अशा उताराच्या ठिकाणी शेती केली जाते. त्या भागाला वायंगणी म्हणतात. येथे पाणी असल्याने चिखलगुट्टा करणे सोपे असते. त्यामुळे येथे उन्हाळी भात पीक घेतले जाते. वायंगणीचा आकार काही ठिकाणी गुंठ्यात, तर काही ठिकाणी चार ते पाच एकरांत असतो. घटप्रभा नदीच्या पात्राजवळ अशा वायंगणी दिसून येतात.