अंबाबाई-त्र्यंबोली भेटीचा आज सोहळा
करवीर निवासिनी अंबाबाई सखी त्र्यंबोलीच्या भेटीला गुरुवारी (दि. 19) लवाजम्यासह निघणार आहे. ललिता पंचमीनिमित्त भरणार्या सोहळ्याची (ceremony) तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी अंबाबाई, तुळजाभवानी, गुरू महाराजांची पालखी लवाजम्यासह टेंबलाई टेकडीकडे रवाना होणार आहेत. पर्यावरणपूरक उत्सव व्हावा, यासाठी प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने केले आहे.
ललिता पंचमी किंवा कोहळा पंचमी नावाने होणार्या सोहळ्याची (ceremony) तयारी टेंबलाई टेकडीवर पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी रात्री 12 वाजता देवीला महाअभिषेक, आरती होऊन कोहळा पूजन करण्यात आले. यानंतर हा कोहळा मंडपामध्ये ठेवण्यात आला. गुरुवारी अंबाबाई, तुळजाभवानी, गुरू महाराज पालखीचे आगमन होऊन त्र्यंबोली भेटीचा सोहळा होईल. यानंतर दुपारी कोहळा फोडण्याचा विधी होणार आहे.
पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन
देवीचा परिसर प्लास्टिकमुक्त असावा, यासाठी टेंबलाई देवस्थान प्रयत्नशील आहे. भाविकांनी सोबत आणलेला कापूर, तेल, कडाकणी यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळावा. परिसरात तेलाची, खाद्यपदार्थांची नासाडी टाळावी, असे आवाहन देवस्थानच्या वतीने प्रदीप गुरव यांनी केले आहे.
झटापट नको
कोल्हासूर राक्षसाला प्रतीकात्मक कुष्मांड म्हणजे कोहळा समजला जातो. त्याचा वध करण्याचा प्रसंग कोहळा फोडण्यातून दर्शवितात. राक्षसाचे म्हणजे कोहळ्याचे तुकडे घरी नेणे योग्य आहे का? यासाठी भाविकांनी झटापट करणे टाळावी, असे आवाहनही गुरव यांनी केले.
वाहतूक मार्गात बदल
टेंबलाई टेकडीकडे वाहनांना टेलिफोन टॉवरपासून पुढे प्रवेश बंद आहे. वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.