अंबाबाईचरणी भाविकांची उच्चांकी संख्या नोंद
नवरात्रौत्सवाच्या पाचव्या दिवशी गुरुवारी करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनाला भाविकांची (Devotees) उच्चांकी संख्या नोंदवली गेली. पहाटे चार ते सायंकाळी सहा यावेळेत 2 लाख 29 हजार 93 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली. त्र्यंबोली भेटीच्या ललिता पंचमी सोहळ्यासह नवदुर्गा मंदिरांमधील विविध धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने शहर गजबजले होते.
नवरात्रीतील पंचमीच्या दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाई व त्र्यंबोलीदेवी भेटीचा सोहळा टेंबलाई टेकडीवर हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी अंबाबाईची गजारूढ पूजा बांधण्यात आली होती. अंबाबाई, तुळजाभवानी व गुरू महाराजांच्या पालख्या शहराच्या मुख्य मार्गांवरून टेंबलाई टेकडीकडे रवाना झाल्या होत्या. यावेळीही शहरात दुतर्फा भाविकांची (Devotees) दर्शनासाठी गर्दी दिसून आली.
अंबाबाईची गजारूढ पूजा
करवीर नगरीतील मल्लालय तीर्थातील सुवर्णकमळे चोरून नेणार्या दैत्यांचा वध त्र्यंबोलीने केला. तसेच कामाक्ष दैत्याने पळवलेला योगदंड त्याचा वध करून त्र्यंबोलीने परत मिळवला होता. मात्र, विजयोत्सवामध्ये देव त्र्यंबोलीस आमंत्रण देण्याचे विसरून गेले, तेव्हा ती रुसून पूर्वेकडील एका टेकडीवर जाऊन बसली. तिचा राग काढण्यासाठी अंबाबाई हत्तीवरून टेंबलाई टेकडीवर जाते, अशी कथा सांगितली जाते. या भेटीवेळी कोल्हासुर म्हणून प्रतीकात्मक कोहळा फोडण्याचा विधी झाला. गुरुवारची अंबाबाईची पूजा ‘श्री’पूजक आनंद मुनीश्वर, किरण मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी बांधली होती.