राजू शेट्टींचा साखर कारखान्यांना स्पष्ट इशारा
प्रत्येक साखर कारखान्याला मागील हंगामातील उसाला (Sugarcane Rate) प्रती टन ४०० रूपये देणे शक्य आहे. परंतु, कागदोपत्री हिशोबात गोलमाल करून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ३७ साखर कारखानदारांनी (Sugar Factory) गतवर्षीच्या गळीत हंगामातील १२०० कोटी हाणले आहेत, असा आरोप राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला.
दिवस रात्र शेतामध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या (Farmer) घामाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ४०० रुपये (Sugarcane Rate) घेऊन १५ लाख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे आहे. यासाठीच हा आमचा संघर्षयज्ञ आहे, असे प्रतिपादनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.
गोरंबे (ता. कागल) येथे आयोजित केलेल्या आक्रोश पदयात्रेतील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शकुंतला बाबूराव ढोले होत्या. शेट्टी म्हणाले, ‘कारखान्यांची हिशोबपत्रके अभ्यासूनच आम्ही ४०० रूपये घेण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे प्रत्येक साखर कारखान्यांनी ते द्यावेत. अन्यथा संघटना उसाचे एक कांडेही तोडू देणार नाही.
‘यासाठी आम्हाला राज्यातील ऊस तोडणी वाहतूक संघटनेने पाठिंबा दिला आहे. हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांचे नसून संपूर्ण समाजाचे आहे. ऊस दरावर संपूर्ण समाजाचे आर्थिक हित दडले आहे. वाहनधारकांना मुकादमांनी ४५०० कोटी रूपयाना बुडवले. कारखान्यांनी याकडे दुर्लक्ष केले. शेतकरी संघटनेने याकडे लक्ष दिल्यावर जिल्ह्यातील २० कोटी रुपये वसूल झाले आहेत.’
स्वागत सुहास कोगनोळे यांनी केले. संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासो पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, सुर्यभान जाधव (सातारा ), प्रदेशाध्यक्ष सावकार मदनाईक, जिल्हा अध्यक्ष अजित पवार, अनुष्का संकपाळ (एकोंडी), आप्पासाहेब पाटील ,ऋषिकेश ढोले (गोरंबे) यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सागर शंभुशेटे, तानाजी मगदूम,नितेश कोगनोळे,अरूण ढोले, दत्ता दंडवते, दत्ता पाटील केनवडेकर, रणजीत गायकवाड उपस्थित होते. आभार निशिकांत कांबळे यांनी मानले.