‘हा’ प्रश्न सोडवण्यासाठी जीवाचे रान करीन – पालकमंत्री हसन मुश्रीफ

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्यात पुन्हा मराठा आंदोलनामुळे संघर्ष पेटायला लागला आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना मराठा आरक्षण प्रश्नी कोणता ना कोणता निर्णय घ्यावाच लागेल यासाठी प्रयत्न करू. यापुर्वीही मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हीच माझी भूमिका होती. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, हा प्रश्न सोडवण्यासाठी जीवाचे रान करीन, असे प्रतिपादन पालकमंत्री (Guardian Minister) नाम. हसन मुश्रीफ यांनी केले.

निढोरी ता. कागल येथे विविध विकास कामांचा लोकार्पण व शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज बापू पाटील होते. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून सर्व घटकांना विश्वासात घेऊन विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन. सामान्य माणसाला हे आपले शासन आहे, असं वाटावं अशी कठोर मेहनत मी घेईन व प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. अतिशय यशस्वी पालकमंत्री म्हणून काम करून दाखवीन, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुश्रीफ पुढे म्हणाले की, रस्ते डांबरीकरण, जल जीवन योजना, नवीन पाणीपुरवठा योजना, यासाठी किती निधी आणला हे मी आज सांगणार नाही. कारण विरोधकांचे डोळे आत्ताच पांढरे होतील. आगामी विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळी लागतील त्यावेळी माझे प्रगती पुस्तक जाहीर करेन. त्या पुस्तकात किती निधी आणला हे स्पष्ट होईल. त्यावेळी आमच्या विरोधकांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

कागल निढोरी मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक वाढली आहे. हा रस्ता दहा मीटर रुंदीने होणे गरजेचे आहे. या रस्त्यासाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून तो चार पदरी होईल असेही त्यांनी सांगितले. देवानंद पाटील यांनी हाती घेतलेली पुरोगामी चळवळ, दलित चळवळ, व्याख्यानमाला अखंडपणे सुरू ठेवावी, यासाठी त्यांच्या मागे हिमालयासारखे उभे राहू. देवानंद पाटील याला कुठेतरी संधी द्या, अशी मागणी या ठिकाणी होत आहे. निश्चितच त्यांना संधी दिली जाईल व ताकद देण्याचे काम केले जाईल, असे स्पष्ट केले.

कोल्हापूरचे पालकमंत्री (Guardian Minister) म्हणून निवड झाल्याबद्दल मुश्रीफ यांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात आला. देवानंद पाटील यांचा वाढदिवसानिमित्त मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार झाला. विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी देवानंद पाटील, बी. एल. मोरबाळे, विक्रम काळे, भैया माने यांची भाषणे झाली.

स्वागत संतोष मोरबाळे यांनी केले. यावेळी प्रवीणसिंह पाटील, प्रवीण भोसले, नवीद मुश्रीफ, मनोज फराकटे, विकास पाटील, शितल फराकटे, रणजीत सूर्यवंशी, जगदीश पाटील, नारायण पाटील, दत्तात्रय पवार, जगदीश पवार, जीवन शिंदे, रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आभार सविता चौगले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *