कोल्हापूर : “निर्णय होईपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम, उद्घाटने बंद”
मराठा आरक्षणाचा (reservation) निर्णय होईपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम, उद्घाटने बंद करण्यासंदर्भात सकल मराठा समाजाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आजपासून सार्वजनिक कार्यक्रम, मेळावे, उद्घाटने बंद केल्याचे जाहीर केले. मुश्रीफ यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या आमदारांनीही आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. मराठा समाजाच्या आंदोलनात आम्ही नेहमीच सक्रिय आहोत. यापुढेही राहू, अशी ग्वाही यावेळी सतेज पाटील, पी. एन. पाटील यांनी आंदोलकांना दिली.
मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुश्रीफ आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी आंदोलकांनी ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देऊन दसरा चौकाचा परिसर दणाणून सोडला.
मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला नेहमीच पाठिंबा असल्याचे सांगून पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, नोकरी आणि शिक्षणात
मराठा समाजाला आरक्षण (reservation) दिलेच पाहिजे, ही आपली भूमिका आहे. या मागणीसाठी आंदोलनात मी नेहमीच सक्रिय सहभागी आहे. उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्याची मागणी मी लावून धरेन. तसेच विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करेन, असेही त्यांनी सांगितले.
आ. पी. एन. पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आम्ही नेहमीच आग्रही राहिलो आहे. आज काँग्रेस कमिटीत पत्रकार परिषद घेऊन आम्ही सार्वजनिक कार्यक्रम-मेळावे घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने आता यामध्ये लक्ष घातले पाहिजे. वेळप्रसंगी घटनादुरुस्ती केली पाहिजे, तरच हा प्रश्न मिटणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची पत्रकार परिषद मी पाहिली; पण त्यामध्ये कोणतेही ठोस आश्वासन त्यांनी दिलेले नाही.
ईडब्ल्यूएस आरक्षण टिकते, मराठ्यांचे का टिकत नाही? : सतेज पाटील
पन्नास टक्के अटीचे कारण दाखवून मराठ्यांना आरक्षण नाकारले जाते. केंद्र सरकारने दिलेले ईडब्ल्यूएसचे आरक्षण देतानादेखील 50 टक्के अटीची मर्यादा ओलांडली आहे. मग मराठ्यांना आरक्षण देतानाच ही अट का आडवी येते, असा सवाल उपस्थित करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही या आंदोलनात सक्रिय राहू, असे सांगितले.
यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे यांच्यासह जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत देसाई, बाबा इंदुलकर, वसंतराव मुळीक, बाबा पार्टे, दिलीप देसाई यांनी भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. शिवाजीराव राणे, यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी गटनेते शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, दुर्वास कदम, सरिता मोरे, माधवी गवंडी, प्रकाश गवंडी, दीपा मगदूम, निलोफर आजरेकर, सुरेश कुर्हाडे, भैया माने, आदिल फरास आदी उपस्थित होते. आंदोलनस्थळी दिवसभरात विविध पक्ष, संघटनांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला.