संतप्त कार्यकर्त्यांनी खा. धैर्यशील माने यांच्यावर केले ‘हे’ आरोप
‘हुडकून द्या हुडकून द्या.. आमचा खासदार हुडकून द्या…’ अशा घोषणा देत सकल मराठा समाजाचा मोर्चा (front) वडगाव पोलिस ठाण्यावर धडकला. यावेळी खा. धैर्यशील माने हरवले असल्याची तक्रार देऊन समाजाची मते घेऊन समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.
मुख्य बाजारपेठेतून फिरून मोर्चा (front) पोलिस ठाण्यासमोर आला. त्या ठिकाणी खा. माने यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांच्याकडे खासदार हरविले असून त्यांचा शोध घेण्याचा अर्ज सुपूर्द करण्यात आला. खा. माने यांनी ना लोकसभेत, ना सभागृहाबाहेर मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतली. तसेच आंदोलनाकडे फिरकलेही नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
मी सदैव मराठा समाजासोबतच : खा. माने
रूकडी : काहीजण स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षणाच्या बाबतीत मी नेहमी समाजबांधवांसोबतच आहे, अशी माहिती खासदार माने यांनी पत्रकाद्वारे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याबाबत निवेदनही दिले आहे. लोकप्रतिनिधी व एक मराठा बांधव म्हणून माझे कर्तव्य व भूमिका योग्य पद्धतीने पार पाडत आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.