कर्नाटक पोलिसांची मुजोरी सुरूच! म. ए. समितीच्या 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १८ पदाधिकाऱ्यांविरोधात मार्केट पोलिस ठाण्यात (Belgaum Police) काल, गुरुवारी (ता. २) गुन्हा (case) दाखल करण्यात आला.
बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावीत, या मागणीकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे १ नोव्हेंबर रोजी काळादिनानिमित्त निषेध फेरी काढण्यात आली होती. या दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व कन्नड भाषिकांच्या भावना दुखाविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे दरवर्षी १ नोव्हेंबरला काळा दिन पाळला जातो. यंदाही त्यानिमित्त एक महिन्यापासून तयारी सुरू होती. शिवाय या दिनासाठी व्यापक जनजागृतीही करण्यात आली होती. यामुळे फेरीला व्यापक प्रतिसाद लाभला. धर्मवीर संभाजी मैदान येथून फेरीला सुरुवात झाली. त्यानंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. या फेरीत हजारो लोक सहभागी झाले होते.
मात्र, या फेरीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व कर्नाटक सार्वभौमत्वाला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत मार्केट पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेतला आहे. त्यानुसार १८ जणांच्या विरोधात गुन्हा (case) दाखल करण्यात आला आहे.
यात माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, सारिका पाटील, रणजित चव्हाण-पाटील, अंकुश केसरकर, नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेविका वैशाली भातकांडे, गजानन पाटील, शिवाजी सुंठकर, एम. जे. पाटील, आर. एम. चौगुले, नेताजी जाधव, सरस्वती पाटील, विकास कलघटगी आदींचा समावेश आहे. याशिवाय अनोळखी दीड हजार जणांविरोधात मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.