मराठवाड्याच्या मदतीला जाणार कोल्हापूरकर
राज्य शासनाने नेमलेल्या समितीने मराठवाड्यात कुणबीच्या 13 हजारांवर नोंदी शोधल्या आहेत. त्याद्वारे संबंधितांना कुणबी जातीचे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत तब्बल 7 हजार 809 जणांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र (Caste certificate) देण्यात आले आहे.
सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. मात्र, राज्य शासनाने कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
या समितीने मराठवाडा तसेच हैदराबाद येथे तपासलेल्या विविध नोंदींत 13 हजारांवर ‘कुणबी’च्या नोंदी आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांच्या वंशावळीत या नोंदी आढळल्या, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
राज्यात अशी परिस्थिती असताना, कोल्हापूर जिल्ह्यात तत्पूर्वीच पुरावे असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र (Caste certificate) देण्यात येत असून, गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील सहा उपविभागीय कार्यालयांतर्गत 7 हजार 962 जणांनी कुणबी दाखल्यांसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 7 हजार 809 जणांना प्रत्यक्ष कुणबी जातीचे दाखले देण्यात आले आहेत. केवळ 153 यापैकी काही प्रकरणे कागदपत्रे अपुरी असल्याने निकाली काढण्यात आली आहेत, तर काही अर्ज प्रलंबित आहेत. जिल्ह्यात पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांत कुणबी जातीचे पुरावे मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
यामुळे या दोन तालुक्यांत सर्वाधिक 4 हजार 239 दाखले देण्यात आले आहेत. सर्वात कमी दाखले चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांतून वितरित झाले आहेत. या दोन तालुक्यांतून तीन वर्षांत 30 प्रकरणे दाखल झाली होती. त्यापैकी 19 दाखले देण्यात आले असून, 11 दाखले प्रलंबित आहेत.
मराठवाड्याच्या मदतीला कोल्हापूर जाणार
मराठवाड्यातील नोंदी शोधताना अनेक कागदपत्रे मोडी भाषेत आढळून आली आहेत. कुणबी दाखल्यांबाबत राज्याचे मुख्य सचिवांनी घेतलेल्या आढावा बैठकीत
कोल्हापूर जिल्ह्यात मोडी अभ्यासक आहेत, त्यांना शासकीय मान्यताही आहे. प्रसंगी त्यांचीही मदत घ्यावी, अशा सूचना संबधित जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत. यामुळे मराठवाड्यातील मराठा बांधवाना कुणबी दाखला मिळवून देण्यात, त्यांच्या मदतीला एकप्रकारे कोल्हापूरकर जाणार आहेत.