जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी 900 कोटी मिळणार?
पुरातत्त्व विभागाकडील जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन (Tourism) स्थळासाठी 900 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमोर शनिवारी पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण होणार आहे.
पर्यटनद़ृष्ट्या विपुल आणि समृद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचा पर्यटन (Tourism) विकास मात्र म्हणावा तसा झालाच नाही. राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रमुख पर्यटन हब होण्याची प्रचंड क्षमता असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचा पर्यटनद़ृष्ट्या विकास व्हावा याकरिता सुमारे 900 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर तसेच रांगणा, पन्हाळा, विशाळगड व पारगड किल्ला आदींच्या विकासाचा या आराखड्यात समावेश आहे.
केंद्राकडे असलेल्या व पुरातत्त्व विभागाकडून संवर्धन होत असलेल्या या सर्व ठिकाणांचा संवर्धन आराखडा तयार केला जात आहे. या निधीतून त्या ठिकाणांचे जतन, संवर्धन, दुरुस्ती व परिसर विकासासाठी कामे केली जाणार आहे. पुरातत्त्व विभागाकडून यासाठी वास्तुविशारद यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 4) केंद्रीय मंत्री नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात या आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे. कोल्हापूरची नाळ जुळलेल्या नाईक यांनी यापूर्वीच पर्यटन विकासासाठी निधी देऊ, असे जाहीर केले होते. त्यांना सादर केल्या जाणार्या आराखड्याला त्यांनी मंजुरी दिली तर जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटनाचा विकास होईल व जगाच्या पर्यटनात कोल्हापूर जिल्ह्याचे नाव अग्रक्रमावर येईल, असा जिल्हा प्रशासनाला विश्वास आहे.
जोतिबा विकास आराखड्यात ‘रोप वे’चा समावेश
जोतिबा मंदिर डोंगर ते पन्हाळा किल्ला यादरम्यान प्रस्तावित ‘रोप वे’चे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश यापूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. पन्हाळा ते विशाळगड या ट्रेकिंगचाही मार्ग आहे. त्यालाही चालना मिळेल, अशी शक्यता आहे.