ग्रामपंचायत निवडणुक मतदानावेळी दोन गटांत हमरीतुमरी
चिंचवाड (ता. करवीर) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने 85 टक्के मतदान (voting) झाले. दरम्यान, बूथ क्रमांक तीनवर उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यावरून हमरीतुमरी, वादावादी, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार आणि गोंधळ उडाला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण निवळले.
रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदान सुरुवात होताच बूथ क्रमांक तीनवर मोठी गर्दी झाली. उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींना केंद्रात सोडण्यावरून वादावादी, हमरीतुमरी झाली. एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार झाला. गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील व त्यांच्या सहकार्यांनी वेळीच हस्तक्षेप केला; पण वातावरण तणावपूर्णच राहिले. सर्वच मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान (voting) केंद्रावर अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांनी भेट देऊन सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांना सूचना दिल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जे मतदार गेटच्या आत असतील त्यांनाच मतदानाचा हक्क द्यावा, अशा सक्त सूचना दिल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिवानंद खोचरे यांनी काम पाहिले. दरम्यान, संबंधित कार्यकर्त्यांना गांधीनगर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते.