कोण होणार घायाळ आणि कोण मारणार बाजी त्याचा आज फैसला
शाहूवाडी तालुक्यातील १० ग्रामपंचातीच्या निवडणुका (election) रविवारी (दि ५) शांततेत पार पडल्या. १० ग्रामपंचायतीसाठी ८३ टक्के व शिरगाव गावाच्या पोटनिवडणूकीसाठी ७८.२९ टक्के मतदान झाले. शाहूवाडी प्रशासनातर्फे मतमोजणी निकालाची जय्यत तयारी करण्यात आली असून, शाहूवाडी येथील जुन्या शासकीय धान्य गोडाऊनमध्ये आज सोमवारी (दि ६) रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली. दुपारी बारापर्यंत सर्वच निकाल हाती येण्याची शक्यता आहे त्यांनतरच ‘गावपुढारी’ कोण? ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची? हे कळणार आहे.
तालुक्यात १० ग्रामपंचायतीच्या व शिरगाव गावच्या एका जागेच्या पोटनिवडणूकीसाठी ३१ मतदान केंद्रावर १८९ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद झाले. त्यामध्ये कोण होणार घायाळ आणि कोण मारणार बाजी त्याचा आज फैसला होणार आहे. शाहूवाडी येथील तहसील कार्यालयाच्या जुन्या शासकीय धान्य गोडाऊनमध्ये सकाळी दहा वाजता ईव्हीएम यंत्र मतमोजणीस प्रारंभ होईल. एकाच फेरीमध्ये ११ टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी २२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून दोन रांगेत ही मोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक असे दोन कर्मचारी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करतील असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
मतमोजणीसाठी टेबल उभारण्याचे काम पूर्ण झाले असून बॅरेकेट्स, टेबल लावणे आदी कामे पूर्ण झाली आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष ईव्हीएम मशिनद्वारे मतमोजणी होणार असल्याचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी रामलिंग चव्हाण यांनी सांगितले.
मोबाइलला बंदी
प्रत्यक्ष मतमोजणी कशी होईल, तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना सूचना देण्यासाठी निवडणूक (election) विभागाने यापूर्वीच बैठका घेतल्या होत्या. मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. उमेदवार प्रतिनिधींना मतमोजणी हॉलमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतमोजणी प्रतिनिधीसह नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यानाही मोबाईल बाळगण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
अशी असेल यंत्रणा
मीडिया सेंटर, ईव्हीएम स्ट्राँगरूम टॅब्युलेशन मॅन्युअल, पोस्टल बलेट मोजणी, टू व्होटर ऑनलाईन अशी यंत्रणा असणार आहे. स्ट्राँगरूममधून मतमोजणी हॉलमध्ये यंत्राची ने आण करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी असणार आहेत.
मतमोजणी होणाऱ्या ग्रामपंचायतींची नावे
एकच फेरी : सकाळी १० वाजता- सावर्डे खुर्द, सावे, सुपात्रे, मालेवाडी, आकुर्ळे, शेंबवणे, वालूर-जावळी, माण-पातवडे, कासार्डे, गेळवडे, शिरगाव.