‘स्वाभिमानी’नंतर रयत संघटनेचा साखर कारखान्यांना स्पष्ट इशारा
गेल्यावर्षी तुटून गेलेल्या उसाला (Sugarcane Rate) साखर कारखान्यांनी (Sugar Factory) ५०० रुपये द्यावे आणि यंदा एफआरपी व अधिकचे ५०० रुपये दर जाहीर करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला.
रयत क्रांती संघटनेच्या वतीने (Rayat Kranti Sanghatana) त्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. ज्येष्ठ शेतकरी नेते सुदाम चव्हाण, रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, युवक काँग्रेसचे अमित जाधव, रयतचे तालुकाध्यक्ष विशाल पुस्तके आदी उपस्थित होते.
निवेदनातील माहिती अशी, मागील वर्षीपासून साखरेचे भाव प्रतिक्विंटल तीन हजार ५०० ते चार हजार रुपये एवढे होते. ती सध्या तीन हजार ८०० रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे साखरेपासून मिळणारे उत्पन्न वाढले आहे. मळी, बगॅस, मॉलेसिस या उपपदार्थांपासूनही उत्पन्न मिळते. त्याचबरोबर कारखान्यांनी इथेनॉल, डिस्टलरी, को-जनरेशनसारखे उपपदार्थांतूनही उत्पन्न मिळते. त्यामुळे मागील वर्षीची एफआरपी देऊनही साखर कारखाने शेतकऱ्यांना आणखी ५०० रुपये द्यावे.
साखर उतारा १२ च्या पुढे १२.६० पर्यंत असल्याने मागील वर्षीचे ५०० रुपये (Sugarcane Rate) देणे शक्य होणार आहे. ते साखर कारखान्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत. ऊस नियंत्रण कायद्यानुसार साखर कारखान्यांनी कारखाने सुरू करण्यापूर्वी यावर्षीची आपली पहिली उचल जाहीर करणे बंधनकारक आहे; परंतु अद्यापही कारखान्यांनी आपली उचल जाहीर केलेली नाही. त्यामुळे साखर आयुक्त यांनी अशा साखर कारखान्यांवर कारवाई करावी.
साखरेचे वाढलेल्या दरामुळे एफआरपीपेक्षा अधिक भाव देता येतो. याबाबत गावोगावी बैठका घेऊन लवकरच ऊस परिषद घेणार आहे. आठ दिवसांत कारखान्यांनी दर जाहीर करावा, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार.