निवडणूक कारखान्यांची, मुहूर्तमेढ विधानसभेची
जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष लागून राहिलेल्या भोगावती आणि बिद्री या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांनी (election) यंदा नवाच विक्रम केला आहे. आपल्याच पक्षातील नेत्यांना धुडकावून लावत कार्यकर्त्यांनी आपल्याला हव्या तशा सोयीच्या तडजोडी केल्यामुळे राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. या दोन कारखान्यांच्या निवडणुकीत विधानसभेची निवडणूक तयारी केली जात आहे.
भोगावती कारखान्यात कौलवकर पॅनेलचा पराभव करून पी. एन. पाटील यांनी पाच वर्षे सत्ता हाती ठेवली. आता पी. एन. कारखान्याच्या सत्तेबाहेर राहून सत्तेची सूत्रे हाती ठेवण्यासाठी गावोगावी दौरे करीत आहेत. काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार असल्याने पी. एन. यांनी बेरजेचे राजकारण केले आहे. ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे हेही सत्तारूढ आघाडीबरोबर आहेत.
पी. एन. पाटील आणि संपतराव पवार-पाटील या सडोलीकरांचे 34 वर्षांचे राजकीय वैर या निवडणुकीत थांबले आहे. क्रांतिसिंह पवार यांनी पी. एन. यांच्या पॅनेलला पाठिंबा देत नवी आघाडी उघडण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बँकेतील यशाने क्रांतिसिंह यांना हुलकावणी दिली तरी त्यांनी घेतलेल्या मतांमुळे मतदारसंघात चर्चा झाली. आता विधानसभेच्या निवडणुकीत ते काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारखान्याचे उपाध्यक्ष उदय पाटील-कौलवकर हे या पॅनेलचे प्रमुख उमेदवार आहेत.
कुंभी कारखाना निवडणुकीत (election) पी. एन. पाटील समर्थकांनी पॅनेल केल्यामुळे कुंभीचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी भोगावती निवडणुकीत आमचे पॅनेल असणार, अशी घोषणा केली होती. आता ते एकेकाळचे पी. एन. यांचे सहकारी आणि भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्या मागे ताकद उभी करून पी. एन. यांच्या विरोधातील राजकीय संघर्षाची धार तीव्र करण्याच्या प्रयत्नात आहेत. भोगावतीचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पाटील-कौलवकर यांचे नातू व कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी पॅनेल उभे करून कारखाना पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बाजूलाच राहिली. तिथे चर्चा आहे ती विधानसभेची. यापूर्वीच्या निवडणुकीत दोन वेळा के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या मेहुण्या-पाहुण्यात समेट घडवून आणलेले राजकारणातील हिंदकेसरी समजले जाणारे
हसन मुश्रीफ यांना यावर्षी मात्र या दोघांना एकत्र ठेवण्यात अपयश आले आहे. ए. वाय. पाटील आम्हाला सोडून का गेले हे सगळं माहिती आहे. मात्र आमची त्यांच्यावरील माया पातळ झाली असे सांगून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी आपल्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षाविरोधात तोफ डागली आहे. ए. वाय. पाटील यांना कारखान्याचे अध्यक्षपद किंवा आमदारकी हवी आहे.
आता ते के. पी. पाटील यांचे कट्टर विरोधक आमदार प्रकाश आबीटकर यांच्या सोबत आहेत. आबीटकर या मतदारसंघातून दोन वेळा शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले. सध्या ते शिंदे गटात आहेत. अजित पवार यांची राष्ट्रवादी ,शिंदे गट आणि भाजप अशी सत्ता राज्यात आहेत. मात्र बिद्रीच्या राजकारणात अजित पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष, भाजप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची एकत्र आघाडी आहे. हसन मुश्रीफ, सतेज पाटील, दिनकरराव जाधव, संजय घाटगे, के. पी. पाटील, राहुल देसाई हे एकत्र आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली असून पालकमंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दंड थोपटले आहेत.
विधानसभेवेळी नेते काय भूमिका घेणार?
ए. वाय. पाटील यांनी या निवडणुकीत स्पष्ट भूमिका घेऊन घुसमट दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी कारखाना निवडणुकीत ते ज्या आघाडीत आहेत त्याचे नेतृत्व संजय मंडलिक, धनंजय महाडिक, समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर यांच्याकडे आहे. त्यामुळे विधानसभेच्या वेळी हे नेते काय भूमिका घेणार ते फार महत्त्वाचे ठरणार आहे. प्रकाश आबिटकर, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राहुल देसाई हे सारेच विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आता कारखाना निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाला मिळणार यावर या मतदारसंघाची राजकीय दिशा स्पष्ट होणार आहे.