कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ ग्वाही
ऊस दराच्या (sugervane rate) प्रश्नावरून गेले दोन महिने आंदोलन सुरू आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून दराचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
ऊस दराचा (sugervane rate) प्रश्न निकाली निघाला नाही, तर आम्ही गुरुवारपासून राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत चक्काजाम करू, असेही शिष्टमंडळाने स्पष्ट केले. सरकार हे शेतकर्यांच्याच बाजूने राहणार आहे. कारखानदारांच्या बाजूने आम्ही नाही. सहकारमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर येथे मुख्यमंत्री आले असता स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली.
स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, ऊस दराच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेली दोन महिने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत. मात्र, साखर कारखाने व प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. शेतकर्यांचा संयम सुटत चाललेला आहे.
राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी गतवर्षीची एफआरपी अधिक 300 ते 500 रुपये दिले आहेत. मग, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना का जमत नाही? सरकार हे शेतकर्यांच्या बाजूने असेल, तर आम्हाला न्याय द्यावा. चुकीची आकडेवारी मांडून प्रशासनाने शेतकर्यांची दिशाभूल चालू केली आहे. हे आम्हाला मान्य नाही. गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सावकर मादनाईक, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, सागर संभूशेटे आदी उपस्थित होते.