कोल्हापूर जिल्हा पर्यटन प्रस्तावाचा पाठपुरावा करा
करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासह जिल्ह्याच्या पर्यटन (Tourism) विकासासाठी जे जे प्रस्ताव सादर केले आहेत, त्याचा पाठपुरावा करा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना केली. अंबाबाई मंदिर परिसराचा विकास केला जाईल, त्यासह जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना दिली जाईल, अशी ग्वाहीही शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दोनच तासासाठी कोल्हापूर दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी अंबाबाईचे सहकुटुंब दर्शन घेतले. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी रेखावार यांच्याकडून अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, त्यानुसार कोणती कामे सुरू आहेत, मंदिर परिसरात कोणती विकासकामे सुरू आहेत आदींचा आढावा घेतला.
केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमोर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या पर्यटन (Tourism) विकास आराखड्यांचे सादरीकरण झाले आहे. त्यानुसार विविध प्रस्ताव राज्य शासनाला सादर केले असल्याचे रेखावार यांनी सांगितले. त्यावर या सर्व प्रस्तावांचा पाठपुरावा करा, असे शिंदे यांनी सांगितले. आवश्यकता असल्यास याबाबत बैठक घेतली जाईल, असे सांगत अंबाबाई मंदिर परिसराचाही विकास केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.