राजू शेट्टींसह २ हजार जणांवर गुन्हा दाखल
तब्बल ८ तास राष्ट्रीय महामार्ग (National Highway) रोखल्याप्रकणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेट्टी यांच्यासह २ हजार कार्यकर्त्यांवरपल देखील गुन्हा दाखल झाला आहे. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
बेकायदेशीररित्या पुणे- बेंगळूर महामार्ग कोल्हापूर येथे रोखल्याने कोल्हापूर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर महामार्गावर रस्ता आडवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे संपूर्ण वाहतूक यंत्रणा थांबली. तसेच नागरिकांची गैरसोय झाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
गत हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता किमान शंभर रुपये मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (दि. २३) पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग (National Highway) रोखून धरला. पंचगंगा नदी पूल परिसरातील दर्ग्याजवळ चक्काजाम आंदोलन केले. दुसऱ्या हप्तबाबत साखर कारखानदार जोपर्यंत सकारात्मक निर्णय घेत नाहीत तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून उठणार नसल्याची आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठेवली होती. काल (दि.२३) रात्री उशीरापर्यंत या मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू होती. रात्री ८ च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ऊस दराची कोंडी फुटली आणि ८.३० नंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि. २३) झालेल्या झालेल्या बैठकीत मागील हंगामातील १०० रुपये आणि पुढील हंगामातील १०० रुपये प्रमाणे कारखानदारांनी मागणी मान्य केली असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले. राजू शेट्टी यांच्या मागणीला अखेर यश आल्याने घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तोडगा निघाला आहे आता सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी लवकरात लवकर मार्ग काढायचा असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले.