‘गोकुळ’ने शेतकऱ्यांना म्हैस खरेदीसाठी मिळणाऱ्या अनुदानात केली वाढ
‘गोकुळ’ने परराज्यातील म्हैस (buffalo) खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात तब्बल १० हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता, अनुदानापोटी ४० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली. ही योजना १२ सप्टेंबर २०२३ नंतर खरेदी केलेल्या म्हशींसाठी असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
अध्यक्ष डोंगळे म्हणाले, संघाने २० लाख लीटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे, खास करून म्हैस दूध संकलनात वाढीसाठी कृती आराखडा तयार केला असून त्यात वैरण विकास, जातिवंत म्हैस (buffalo) खरेदी, जातिवंत मादी वासरू संगोपन, कृत्रिम रेतन कार्यक्रम यावर भर देण्यात आला आहे. संघाच्या म्हैस दूधसाठी मुंबई, पुणे कोकण तसेच इतर शहरात मागणी वाढत आहे. म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हशींचा भाकड काळ कमी व्हावा तसेच गोठ्यात तयार झालेल्या पाड्या व रेड्यांना संतुलित आहार मिळावा या उद्देशाने देय अनुदानातील काही रक्कम पशुआहाराच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम संस्थेच्या दूध बिलातून रोख स्वरूपात देण्याचे संचालक मंडळाने निश्चित केले आहे.
असे मिळणार अनुदान ..
हरियाणा (मुऱ्हा, बन्नी, मेंढा) : ४० हजार
गुजरात (मेहसाना, जाफराबादी) : ३५ हजार
इतर अनुदानात केलेली वाढ..
जातिवंत मादी वासरू संगोपन योजनेतंर्गत जातिवंत रेडीसाठी दोन वेतासाठी २७ हजार अनुदान.
जातिवंत पाडीसाठी दोन वेतासाठी साडे पाच हजार अनुदान
वैरण विकास कार्यक्रमातंर्गत वैरण पिके घेण्यासह सायलेजसाठी ३५ टक्के अनुदान
ट्रॅक्टर ऑपरेट बेलिंग मशीन खरेदीसाठी २५ हजार अनुदान
वाळलेली वैरण (कडबा कुट्टी, गव्हाचे काड, तूर कुट्टी ) खरेदीसाठी १ हजार अनुदान
१ टन क्षमतेची सायलेज बॅगेसाठी २५ टक्के अनुदान
मुक्त गोठा सुधारित अनुदान १५ हजार
प्रस्ताव सादर करताच १० हजार रुपये उत्पादकांनी म्हैस खरेदी प्रस्ताव सादर केल्यानंतर वाहतूक खर्चा पोटी तात्काळ १० हजार संस्थेच्या दूध बिलातून दिले जाणार.
खरेदी केल्यानंतर किंवा व्याल्यानंतर १५ हजार रुपयांचे पशुआहार पॅकेज देणार. तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर हरियाणा म्हशीसाठी १५ हजार तसेच गुजरात म्हशीसाठी १० हजार दूध बिलातून अनुदान देणार.