‘या’ कारखान्याच्या निवडणुकीकडे लागून राहिले संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष
बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत (election) सत्ताधारी आणि विरोधक अत्यंत आक्रमक झाले आहेत. फाटाफुटीने दोन्ही बाजूंनी आरोप, प्रत्यारोपांचा मारा सुरू आहे. राजकीय विरोधकांना इशारा देत पुढच्या निवडणुकीसाठी आताच आव्हान दिले जात आहे. सहकारात राजकारण नसते असे सांगत नेत्यांनी त्यांना सोयीच्या भूमिका घेऊन राजकारण दामटविणे सुरू केले आहे. त्यामुळे प्रचाराला धार आली आहे. सत्ताधार्यांकडून सत्ता टिकविण्यासाठी चांगल्या कारभाराचा आलेख मांडला जात आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. (Bidri Election)
बिद्री कारखान्याची निवडणूक नेहमीच गाजते. चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असल्यामुळे या निवडणुकीत चार तालुक्यांचे नेते एकत्र येतात. त्यांच्या पाठोपाठ राजकारणही मोठ्या प्रमाणात चालत येते. त्यामुळे अन्य कोठेही होत नाही, अशी चुरशीची निवडणूक केवळ बिद्रीतच होते. (Bidri Election)
आताही जिल्ह्यातील आगामी राजकारणाच्या ध—ुवीकरणाची सुरुवात बिद्रीतून होत आहे. खा. संजय मंडलिक, आ. हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांना आव्हान दिले आहे. अंबरिषसिंह घाटगे यांनी, मंडलिक कारखान्याचे नावही घेतले नसताना संजयदादा को गुस्सा क्युं आता है, असे म्हणत पलटवार केला. त्यामुळे प्रचाराला चांगलीच धार आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी सत्ताधारी आघाडीच्या बाजूने आपली राजकीय ताकद उभी केली आहे. खा. संजय मंडलिक यांनी आ. हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांना आव्हान दिले खरे मात्र लोकसभा निवडणुकीच्या (election) प्रचारात मुश्रीफ यांना व्यासपीठावर घ्यावे लागणार, हेही तेवढेच खरे. कारण मुश्रीफ, मंडलिक आणि समरजितसिंह घाटगे महायुतीचे जिल्ह्यातील नेते आहेत.
समरजितसिंह घाटगे यांनीही प्रचारात हयगय केलेली नाही. बिद्रीच्या कारभारावर नेमकेपणाने बोट ठेवताना घाटगे यांनी, बिद्रीत पारदर्शक कारभार करणार असल्याचे सांगितले. यातून त्यांनी सध्याचा कारभार कसा चालला आहे, हे अधोरेखीत केले आहे.
बिद्रीतील सभासद आणि जनाधार आपल्याच मागे असल्याचे सांगून हसन मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांनी सत्ताधारी गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे.‘बिद्री’त महालक्ष्मी आघाडीचे यश निश्चित असल्याचे सांगत हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना जुमानतच नसल्याचे आपल्या वक्तव्यातून जाणवून दिले आहे.
प्रचाराची पातळी टोकाला
सत्ताधारी आघाडीत पडलेल्या फुटीमुळे तसेच मेहुणे, पाहुणे यांच्या दिशा परस्पर विरोधी झाल्याने प्रचार धारदार बनला आहे. ए. वाय. पाटील यांनी बिद्रीत परिवर्तन अटळ असल्याचे सांगून आपल्याच मेहुण्याला धक्का देण्याची तयारी केली आहे. सत्ताधार्यांनी उच्चांकी दर हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा केला होता. मात्र, एकूणच प्रचाराची पातळी इतक्या टोकाला गेली आहे की, उद्याच्या राजकारणात या नेत्यांना एका व्यासपीठावर यावे लागेल तेव्हा तो चर्चेचा विषय ठरणार आहे.