कोल्हापुरातील कलाकाराने साकारली मराठा आरमारातील गुराब जहाजाची प्रतिकृती

भारतीय आरमाराचे जनक शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदा 350 वे वर्ष आहे. यानिमित्ताने भारतीय नौसेनेच्या वतीने यावर्षीचा नौसेना दिवस (4 डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी कलानगरी कोल्हापुरातील कलाकार किरण भालचंद्र ढमढेरे यांनी मराठा आरमारातील गुराब जहाजाची प्रतिकृती (Replica) साकारली आहे. ढमढेरे ही प्रतिकृती नौदलाच्या प्रमुखांना भेट देणार आहेत.

भारतीय नौसेना दिवस कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असणार आहेत. यानिमित्ताने मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरणही होणार आहे. यावेळी सरखेल कान्होजी आंग्रे तसेच हिरोजी इंदुलकर यांचे वंशज यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

बारकाव्यांनी परिपूर्ण गुराब जहाज…

कोल्हापूरचे कलाकार किरण ढमढेरे यांनी मराठा आरमारातील गुराब या जहाजाची प्रतिकृती (Replica) साकारली आहे. युरोपियन व्हाईट बीच वूड या लाकडाचा वापर करून 4 फुटांची गुराब जहाजाची प्रतिकृती निर्माण केली आहे. जहाजात मोठाली शिडे, लांबलचक दोरखंड, लढाऊ तोफा, उंच शिड्या, भगवे ध्वज असे बारकावे लक्षवेधी आहेत. दीड महिन्याच्या कालावधीत इंटरनेट तसेच विविध इतिहासविषयक ग्रंथांतून संदर्भ घेऊन आणि इतिहास संशोधक-अभ्यासकांशी चर्चा करून ढमढेरे यांनी या जहाजाची प्रतिकृती तयार केली आहे.

8 इंचांपासून 5 फुटांपर्यंतच्या जहाजांची निर्मिती

शालेय जीवनापासून किरण ढमढेरे यांना जहाजांविषयी प्रचंड आकर्षण होते. तेव्हापासून त्यांनी विविध प्रकारच्या नावा, होड्या व जहाजांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. गेली 23 वर्षे ते कोल्हापुरात कला क्षेत्रात सेवा बजावत आहेत. त्यांनी यापूर्वी अवघ्या 8 इंचांपासून ते 5 फुटांपर्यंतच्या जहाजांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. रत्नागिरी येथील थीबा पॅलेसमध्ये त्यांच्या 21 जहाजांच्या प्रतिकृती आहेत. दिल्ली येथे 6 प्रतिकृती असून, यात मराठा, ब्रिटिश व पोर्तुगीज जहाजांच्या प्रतिकृतींचा यात समावेश आहे. बेळगाव मराठा इन्फंट्रीतही ढमढेरे यांनी साकारलेल्या मराठा जहाजाची प्रतिकृती पाहायला मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *