कोल्हापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी!
शेंडा पार्कमध्ये 1,100 बेडचे सर्व सोयी आणि सेवासुविधांयुक्त अद्ययावत हॉस्पिटल (hospital) होणार आहे. 30 एकर जागेत होणार्या या हॉस्पिटलसाठी 451 कोटींच्या स्वतंत्र प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या हॉस्पिटलसाठी एकूण 1 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेंडा पार्कात राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 30 एकर जागा राखीव आहे. या जागेत महाविद्यालयाचे हे अत्याधुनिक हॉस्पिटल होईल. हा संपूर्ण परिसर विकसित करण्याचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. लवकरच या हॉस्पिटलचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
हॉस्पिटलसाठी 451 कोटींच्या तीन स्वतंत्र प्रशासकीय मान्यता मिळाल्या आहेत. याखेरीज सात मोड्युलर ऑपरेशन थिएटर, सीएसएसडी, इमारतींची आणि अंतर्गत रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती यांच्या निधीसाठीही 73 कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
इमारत बांधकामे पूर्ण झाल्यानंतर सर्व सेवासुविधा आणि परिसर सुधारणांसाठी एक हजार कोटींहून अधिक रुपये खर्च होणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील ऑडिटोरियम हॉल, नवीन परीक्षा भवन, मध्यवर्ती ग्रंथालय इमारत, शवविच्छेदनगृह, मुलींचे वसतिगृह या पाच इमारतींचे 58 कोटी निधीच्या खर्चातून झालेल्या कामांचा शहा यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे. सीपीआरमध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनसाठी 44 कोटींचा निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.
असे होणार हॉस्पिटल…
एकूण 30 एकरांत 1,100 बेडचे सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटल (hospital)
आरोग्य संकुल; न्यायवैद्यकशास्त्राची स्वतंत्र इमारत
सामान्य रुग्णालय, बाह्यरुग्ण विभाग : 600 बेड
कॅन्सर हॉस्पिटल बेड : 250
सुपर स्पेशालिटी बेड : 250
निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता
पुरुष वसतिगृह : क्षमता 250
निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता महिला वसतिगृह : क्षमता 250
मुलींचे वसतिगृह : क्षमता 150
मुलांचे वसतिगृह : क्षमता 150
परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत : क्षमता 300
सेंट्रल लायब—री
परीक्षा भवन : क्षमता 400
अंतर्गत रस्ते डांबरीकरण व काँक्रीटीकरण