जयप्रभा स्टुडिओ व्यवहारास न्यायालयाने दिले आदेश
जयप्रभा स्टुडिओच्या व्यवहारास तूर्तास मनाई देण्याचे आदेश कोल्हापूरच्या दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांनी दिले आहेत. महालक्ष्मी एलएलपी स्टुडिओ अगोदर लालचंद छाबरिया यांच्याशी व्यवहार झाले आहेत. त्यामुळे स्टुडिओचे कोणतेही स्वरूप व बोजा निर्माण करू नये तसेच त्याची विक्री न करण्याचे आणि मिळकतीत बदल न करण्याचे आदेश (order) दिले आहेत. त्यामुळे स्टुडिओ महापालिकेने ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला अडथळे येण्याची शक्यता आहे.
लता मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओची महालक्ष्मी एलएलपी या कंपनीला विक्री केल्यानंतर कोल्हापुरातील कलाप्रेमींनी आंदोलन सुरू केले. हे आंदोलन अनेक महिने चालले. यानंतर शासनाने हा स्टुडिओ ताब्यात घ्यावा, अशी मागणी झाली. शासनानेही महापालिकेला पत्र लिहून जयप्रभा स्टुडिओ ताब्यात घेण्याचे आदेश दिले. दरम्यान, ही मिळकत लता मंगेशकर यांनी 2019 साली लालचंद परशराम छाबरिया यांना विकल्याचा दावा करण्यात आला आहे.
यासाठी लता मंगेशकर यांना आरटीजीएसद्वारे 2 कोटी 30 लाख रुपये पाठवले. नंतर त्या आजारी पडल्या. कोरोना काळात लता मंगेशकर व कुटुंबीयांनी महालक्ष्मी स्टुडिओज एलएलपी यांना स्टुडिओ विक्री केल्याची माहिती मिळाल्यानंतर छाबरिया यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने वरील आदेश (order) दिले आहेत.