कार्यक्षेत्राबरोबर ‘या’ निकालाकडे लागून राहिले जिल्ह्याचे लक्ष
बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत (election) रथी-महारथी उतरल्यामुळे अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे. प्रथम एकतर्फी वाटणारी निवडणूक राजकीय उलथापालथीमुळे अॅक्शन मोडवर आल्याने कमालीच्या चुरशीने 89.03 टक्के मतदान झाले. दोन्ही आघाड्यांना विजयाची खात्री असली तरीही गुलाल कुणाला, हे मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. या निकालाकडे कार्यक्षेत्राबरोबर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
बिद्री निवडणुकीचे रविवारी मतदान झाले. 56 हजार 91 मतदारांपैकी 49 हजार 940 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 25 संचालक मंडळाच्या जागेसाठी अपक्षांसह 56 उमेदवार रिंगणात आहेत. बिद्री परिसरात सतर्क असणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन उमेदवार ताकद आजमावत आहेत. गत निवडणुकीत 80 टक्के मतदान झाले होते. सुमारे 1200 ते 4500 मताधिक्य सत्ताधारी गटाने मिळविले होते.
यावेळी मताचा टक्का वाढला आहे. तो कुणाला लाभधारक ठरेल याची चर्चा सुरू आहे. निवडणुकीत दोन्ही आघाड्यांनी हायटेक प्रचार यंत्रणा राबविली होती. दरम्यान, बंद मतपेटीतील सभासद मतदारांनी कौल कुणाच्या बाजूने दिला हे मंगळवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. निवडणुकीत (election) दोन मंत्री, दोन खासदार, दोन आमदार, कागलचा शाहू समूह, पाच माजी आमदार, दोन पक्षांचे जिल्हाध्यक्ष, गोकुळचे अध्यक्ष यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.