पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयात सूचना

नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडवा, अशी सूचना पालकमंत्री (Guardian Minister) हसन मुश्रीफ यांनी केली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनता दरबारात 750 हून अधिक नागरिकांनी 250 हून अधिक अर्ज दाखल झाले. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठांनी आपल्या अडचणी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे मांडल्या.

गेल्या आठवड्यात कागल येथील खानू भागोजी रानगे या मेंढपाळाची बकर्‍याची 15 लहान पिल्ले तरस प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाली होती. त्यांना हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत यावेळी देण्यात आली. या घटनेचा पंचनामा झाला असून या मेंढपाळाला शासनाच्या नियमानुसार तातडीने मदत देण्याच्या सूचना (Guardian Minister) मुश्रीफ यांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

विकसित भारत संकल्प यात्रा अभियानांतर्गत जिल्ह्यात गावोगावी योजनांची माहिती व नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

जनता दरबारात महसूल व तहसीलदार कार्यालयाशी संबंधित 64, जिल्हा परिषद 27, कोल्हापूर महानगपालिका 22, पोलीस विभाग 19, भूमिअभिलेख विभाग 9 आदी विभागांशी संबंधित अर्ज दाखल झाले. मुश्रीफ यांनी प्रत्येक अर्जदाराशी चर्चा करून अर्ज निकाली काढण्यासाठी त्या त्या विभागाकडे दिले.

यावेळी आमदार पी. एन. पाटील, महापालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, इचलकरंजी मनपा उपायुक्त तैमूर मुलाणी, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अिऋकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आ. राजेश पाटील यांनीही दिला अर्ज

जनता दरबारात आमदार राजेश पाटील यांनी कुणबी जातीचे दाखले मिळण्याबाबतचा अर्ज सादर केला. गेल्या महिन्यातील जनता दरबारात 337 अर्ज सादर झाले होते. यातील सर्वांना संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीबाबत लेखी स्वरूपात कळवल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *