पिण्याचा बहाना… हातात ठेवा परवाना!

दारू पिण्याचा परवाना असेल, तर पाहिजे तेवढी दारू पिण्याची संधी मिळणार आहे. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी यंदा जिल्ह्यात दारू पिण्याच्या परवाना (License) घेण्यामध्ये 25 टक्के वाढ झाली आहे. यातून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळाला आहे. जिल्ह्यातून 2 लाख 7 हजार इतकी देशी-विदेशी दारू पिण्याच्या परवान्यांची विक्री झाली आहे. 31 डिसेंबरपर्यंत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

शासन दारू पिण्यासाठी शासन अधिकृतपणे परवाना देत आहे. काही परवाने कायमस्वरूपी, तर काही ठरावीक दिवसांसाठी दिले जातात. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 31 डिसेंबर रोजी मद्य विक्रीची दुकाने, परमिट रूम पहाटे पाचपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याशिवाय, काही ठिकाणी वाईन शॉप, परदेशी आणि उंची मद्य विक्री करणारी दुकानेही रात्री 1 पर्यंत खुली असणार आहेत. पब, बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट्स, बीअर बारदेखील पहाटे पाचपर्यंत खुली असणार आहेत. पण उत्साहाच्या वातावरणात पोलिस कारवाईचे गालबोट लागू नये यासाठी अधिकृत दारू पिण्याचा परवाना उपलब्ध करून दिला आहे. देशी दारूसाठी 2 रुपये व विदेशी दारूसाठी रुपये देऊन कोणत्याही बार अथवा दारू विक्रीच्या दुकानात परवाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. मद्याच्या विक्रीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला आर्थिक फायदा होणार आहे.

गृह विभागाने दिलेल्या आदेशानुसार, सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था यांचा विचार करून वेळेच्या शिथिलतेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

परवान्याशिवाय दारू पिताना आढळल्यास कारवाई

शासनाने 31 डिसेंबरच्या अनुषंगाने अधिकृतपणे दारू पिण्यासाठी परवाना (License) दिला आहे. तरीही विनापरवाना दारू पिताना अढळल्यास कारवाई होऊ शकते. परवाना घेतला म्हणजे कोणतेही गैरकृत्य करता येणार नाही. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हअंतर्गत फौजदारी कारवाई होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे कृत्य करता येणार नाही. असे गैरकृत्य केल्यास संबंधितावर कारवाई करून न्यायालयात हजर केले जाते. त्याच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *