दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी!

पर्यटकांची हुल्लडबाजी आणि अभयारण्याच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव दाजीपूर अभयारण्य ३० (Dajipur Sanctuary) आणि ३१ डिसेंबर रोजी पर्यटकांसाठी (Tourists) बंद राहणार आहे. अशाप्रकारच्या सूचना वन्य विभागाने (Forest Department) परिस्थितीकी विकास समिती आणि पर्यटनाशी संबंधित असलेल्या सर्वांना दिल्या आहेत.

वर्षाखेरीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनस्थळावर जेवणाच्या आणि ओल्या पार्ट्या करताना दिसून येतात. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे काचा आणि प्लास्टिकचा कचरा होतोच, शिवाय सुकलेल्या गवताला आगी लागण्याची शक्यताही अधिक प्रमाणात असते.

मद्यपी पर्यटकांकडून आग लागण्याचे प्रकार घडल्यास जंगलाचे व वन्य जीवांचे नुकसान होऊ शकते. शिवाय काचांमुळे वन्यप्राण्यांना नाहक त्रास होतो. दाजीपूर परिसरातील हसणे ते दाजीपूरपर्यंतच्या सहा किलोमीटरमध्ये राधानगरी तलावाच्या काठावर मोठ्या संख्येने पर्यटक जेवणाच्या पार्ट्या करीत असतात. शिवाय कारिवडे, राऊतवाडी परिसरातही पर्यटक आवर्जून येतात. येथे हुल्लडबाजीमुळे ध्वनिप्रदूषण होऊ शकते.

याचा विचार करून पर्यटकांसाठी (Tourists) ३० व ३१ डिसेंबर रोजी दाजीपूर अभयारण्यात प्रवेशबंदी केली आहे. या काळात पर्यटक आढळल्यास त्यांच्यावर वन्यजीव विभागाच्या वतीने कडक व कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस पर्यटकांसाठी दाजीपूर बंद राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *